कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी 60 खाटांची आयसीयू सुविधा

 


अमरावती, दि. 20 :  कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना उपचार सुविधांतही भर पडणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी जीवाची बाजी लावून लढत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टर मंडळींच्या मदतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी साठ खाटांची आयसीयू सुविधा उपलब्ध होत आहे.

यापुढेही वैद्यकीय क्षेत्रातील  मंडळींनी शासकीय आरोग्य यंत्रणेला असेच सहकार्य करून अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

डॉ. महेंद्र गुढे, डॉ. सत्येश शिरभाते, डॉ. ज्ञानदे यांच्यासह एकूण पाच डॉक्टरांनी उपलब्ध 140 खाटांपैकी साठ खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचारासाठी अतिरिक्त आयसीयू सुविधा निर्माण होणार आहे. हार्ट, न्यूरो, ऑर्थोपेडिक व क्रिटिकल केअर आवश्यक असलेल्या रुग्णांचे उपचार तिथे शक्य होणार आहेत.

या सुविधांची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी काल केली. आमदार बळवंतराव वानखडे, माजी खासदार अनंतराव गुढे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख यांच्यासह डॉक्टर व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोरोनाचे संक्रमण लक्षात घेऊन विविध उपाययोजना होत आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालय व आयटीआय परिसर येथे शंभर खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्याशिवाय खासगी डॉक्टरांच्या मदतीनेही अतिरिक्त उपचार सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. कोरोनाच्या साथीवर मात करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी.  सर्वांनी एकजूट होऊन दक्षता पाळून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area