कोरोनावरील उपचारासाठीच्या रेमडेसिवीरचा दुर्गम भागातही पुरवठा करा – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

 


मुंबई दि.23 : कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुंबई, ठाणे व इतर मोठ्या शहरात तुटवडा नसून राज्यातील दुर्गम भाग जसे विदर्भातील काही जिल्हे बुलडाणा, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, उस्मानाबाद या दुर्गम भागातही रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध करण्यात यावे. यासाठी  उत्पादक व वितरकांनी  आवश्यक उपाययोजना  करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठयाबाबत आढावा बैठक  झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरव विजय, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, सहआयुक्त (दक्षता) सुनिल भारद्वाज यांच्यासह सिप्ला, डॉ. रेड्डी, जुबीलंट, झायडस या औषध उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. शिंगणे म्हणाले, राज्यातील रुग्णांना लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची संख्या आणि उपलब्ध साठा याचा सातत्याने आढावा घेऊन  ज्या भागात रुग्ण आहेत त्या भागात रेमडेसिवीर  इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. रुग्णांना हे औषध जवळच्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध होईल याची माहिती घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयातील कंट्रोल रुममधून संनियंत्रण करावे.  याबाबतची माहिती जनतेला देण्यात यावी. राज्यात उत्पादन होणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनच्या साठ्याबाबत तसेच प्रत्येक जिल्ह्यात त्याचे दैनंदिन वितरण व वापर याबाबतची माहिती नियंत्रण कक्षात उपलब्ध व्हावी.

वितरकांनी राज्यात रुग्णांच्या संख्येचे वाढते प्रमाण विचारात घेता त्यांना प्राप्त होणाऱ्या साठ्यापैकी जास्तीत जास्त पुरवठा महाराष्ट्रात करावा. दुर्गम भागातही रुग्णांना सहजतेने रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठीची यंत्रणा उभारण्यावर भर देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दि. 22 सप्टेंबर रोजी राज्यात 15,779 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून दि. 30 सप्टेंबर पर्यंत सुमारे 1,50,256 इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती उत्पादकांनी दिली. त्यामुळे येत्या काळात वितरण नियोजन योग्य रितीने केल्यास तुटवडा भासणार नाही.

कोरोना उपचारात सरसकट सर्वच रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन  न देता रुग्णाला कोणत्या टप्प्यात रेमडेसिवीर इंजेक्शन वापरावे यासाठीचे आवश्यक प्रोटोकॉल ठरवून देण्याचे कार्य आरोग्य विभागाच्या टास्क फोर्समार्फत केले जावे यासाठी मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही श्री.शिंगणे यावेळी म्हणाले.

गरजू रुग्णांना इंजेक्शन देण्याबाबत अडचण येत असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांक  १८ ०० २२२ ३६५  वर संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ.शिंगणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area