जालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

 


मुंबई, दि. ३० : जालना व वर्धा येथील ड्रायपोर्ट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर २०२० पर्यंत हे पोर्ट कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक व सांगली येथील ड्राय पोर्टसाठी जागा निश्चिती करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच ‘जेएनपीटी’च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.

 

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील चार ड्रायपोर्टचा आढावा घेण्यात आला. यावेळी ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, जेएनपीटीचे मुख्य अभियंता एस. व्ही. मधभावी उपस्थित होते.

 

राज्याच्या विविध भागांतून उत्पादित होणाऱ्या मालाला देश-विदेशात बाजारपेठ मिळावी, येथील मालाची जलदगतीने आयात-निर्यात व्हावी यासाठी जालना, वर्धा, नाशिक तसेच सांगली येथे ड्रायपोर्ट विकसित केले जात आहे. जालना, वर्धा  येथील ड्रायपोर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर २०२० पर्यंत हे पोर्ट सुरू होईल, अशी माहिती ‘जेनपीटी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

मराठवाड्यातील उद्योग क्षेत्राला गती मिळण्यासाठी जालना येथील ड्रायपोर्ट उपयुक्त ठरेल. तर वर्धा येथील ड्रायपोर्टमुळे विदर्भातील औद्योगिकरणाला चालना मिळेल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला. यासोबत नाशिक व सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्टसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश श्री. देसाई यांनी दिले. यासाठी एमआयडीसी व जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. देसाई यांनी दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area