मालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे

 


मुंबई, दि. 29 : मालाड पूर्व  दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांबाबत आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. आमदार सुनिल प्रभू यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या भागातील रखडलेली विविध विकासकामे नियोजित वेळेत मार्गी लावण्यात यावीत, अशा सूचना पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

एमएमआरडीए, एसआरए, मुंबई महापालिका, वन विभाग यांच्या माध्यमातून आणि समन्वयातून मालाड पूर्व दिंडोशी विभानसभा क्षेत्रात विविध विकासकामे सुरु आहेत. या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस आमदार  सुनिल प्रभु, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  सुरेश काकाणी, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ.  के. एच. गोविंदराज, वन विभागाचे प्रधान सचिव  मिलिंद म्हैसकर यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मालाड पूर्व कुरार गाव, हुमेरा पार्क येथील राणी सती मार्ग, मल्लिका हॉटेल ते दिंडोशी बस डेपो यांना जोडणारा रस्ता आणि या रस्त्याच्या पुढील टप्प्यात असणाऱ्या पात्र घरांचे स्थलांतर करुन प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करणे, मालाड पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गाखालून मालाड रेल्वेस्थानक ते आप्पा पाडा यांना सलग जोडणाऱ्या पुष्पा पार्क पादचारी भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम जलद गतीने पूर्ण करणे, गोरेगाव पूर्व येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड विकासकामासाठी मुंबई महापालिकेने निधी मंजूर केला असून हा उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु करणे, कांदिवली लोखवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करणे, यासाठी विन विभागाची नाहरकत मिळवणे, या रस्त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भागात भुयारी मार्गाचे नियोजन करणे, इतर भागातील पात्र घरांचे स्थलांतर करणे, कुरार नाला पात्राचे रुंदीकरण करणे, येथील घरांचे 3/11 सारखी योजना राबवून स्थलांतर करणे, संस्कार कॉलेज येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसीत करणे, येथील बाधित घरांचे पुनर्वसन करणे, पोईसर नदीच्या पात्रातील तसेच कुरार नाल्याच्या पात्रातील रुंदीकरणाच्या हद्दीत येणाऱ्या घरांना त्याच भागात घरे उपलब्ध करुन देणे आदी विविध प्रलंबित विकास कामांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली.

 

पालकमंत्री  श्री. ठाकरे म्हणाले, या भागातील सर्व प्रलंबित कामे जलद गतीने पूर्ण करावीत, तसेच प्रत्येक विकासकाम पूर्ण करण्यासाठी निश्चित वेळ निर्धारित करुन नियोजीत वेळेत कामे पूर्ण करण्यात यावीत. या विकास कामांच्या प्रगतीबाबत माहिती द्यावी. काही दिवसानंतर पुन्हा बैठक घेऊन कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

संबंधीत एमएमआरडीए, एसआरए, मुंबई महापालिका, वन विभाग यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामे जलद गतीने मार्गी लावल्यास बाधितांचे पुनर्वसन होणे, विविध रस्त्यांची कामे मार्गी लागल्यास वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यामुळे ही कामे संबंधित विभागांनी जलद गतीने मार्गी लावावीत, असे यावेळी आमदार  सुनिल प्रभू यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area