माथाडींचे प्रत्येक‍ स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी सरकारची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

 


मुंबई दि. २५: माथाडी कामगारांच्या सर्व प्रश्नांची आणि मागण्यांची आपल्याला जाणीव असून माथाडींचे प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी सरकारची असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच कष्टकरी माथाडी कामगारांच्या हक्काच्या घराची  योजना  मार्गी लावण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी राज्याचे सहकार  व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांच्यासह माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार

अण्णासाहेब पाटील महामंडळाला काहीही कमी पडू देणार नाही हे सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की,  माथाडी म्हणजे जिद्द आणि कष्टाचे प्रतीक आहे… यात चिवटपणा आणि संघर्षही आला. अण्णासाहेबांची ही परंपरा तितक्याच जिद्दीने आणि तडफेने पुढे नेण्याचे काम नरेंद्र पाटील करत आहेत.  माथाडी हॉस्पिटलचे कामकाज असेल, माथाडी कायद्यातील त्रूटी दूर करणे असेल, कामगार नोंदणी आणि कार्यक्षेत्राच्या मर्यादेचे नियम असतील, माथाडी कामगारांनी पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज असेल या सगळ्यांची माहिती आपल्याला आहे. आपल्यातील एकजूट जपत आपल्याला समर्थ आणि सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. अण्णासाहेबांनी पाहिले होते ते पूर्ण करायचे आहे.

मराठा आरक्षणाची लढाई जिंकायचीच आहे

मराठा आरक्षणासंदर्भात सर्व पक्षांनी मिळून जो निर्णय घेतला तो उच्च न्यायालयात आपण जिंकलो परंतु त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. तिथेही आपण पूर्ण ताकदीने लढतो आहोत. देशातील सर्वोत्तम वकील आपण या खटल्यासाठी दिले आहेत.यात कुठेही सरकार कमी पडत नाही, पडू देणार नाही. अनपेक्षितपणे जी स्थगिती दिली गेली ती उठवण्यासाठी आपण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ही स्थगिती उठेपर्यंत न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेत इतर माध्यमातून मराठा समाजाला लाभ देणारे निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. ज्येष्ठ विधी तज्ज्ञांशी सातत्याने सल्लामसलत सुरु आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकून शासन निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आवाहन करताना म्हटले की, ही न्यायालयीन लढाई आहे. त्यामुळे न्यायदेवतेचा अवमान होणार नाही याची खबरदारी घेऊन आपल्याला ही लढाई लढायची आहे. जिंकायची आहे. ती जिंकण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने मराठा समाजासोबत आहे. कोणत्याही समाजावर कोणताही अन्याय होऊ न देता मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित

राज्यातच नाही तर जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे…कोरोना विरुद्धच्या लढ्यात अनेकांना बाधा होत आहे तर दुर्देवाने काही मृत्यूही झाले आहेत. त्यामुळे या साथीपासून सुरक्षित राहणे गरजेचे असून यासाठी “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” सर्वांसाठी महत्त्वाची आहे.   एकमेकांपासून अंतर राखणे, तोंडावर मास्क लावणे, सतत हात धुत राहणे, बाहेरून घरी गेल्यावर आंघोळ करणे आवश्यक आहे. मी सुरक्षित राहिलो तर माझे कुटुंब सुरक्षित राहणार आहे आणि ज्या समाजात हे कुटुंब वावरते तो समाजही सुरक्षित राहण्यास यामुळे मदत होणार आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना मिळून कोरोना विरुद्धची ही लढाई लढायची आणि जिंकायची आहे. हा शूरवीरांचा,लढवय्यांचा, साधुसंतांचा आणि कष्टकरी माथाडींचा महाराष्ट्र आहे. आपण सगळे मिळून शिस्तीने ही लढाई लढू आणि जिंकू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

सहकार मंत्री श्री.पाटील म्हणाले, अण्णासाहेबांनी कामगारांना संघटित करुन खऱ्या अर्थाने कामगारांच्या हक्काच्या लढ्याला सुरुवात केली आणि त्यांना सन्मान मिळवून देण्याचे काम केले. माथाडींचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन आपल्या पाठीशी आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते श्री.फडणवीस, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच आमदार नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कामगारांचा गौरव करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area