माथाडी कामगारांचे दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

 मुंबई, दि. २५ :- माथाडी कामगारांचे दैवत, माथाडी चळवळीचे संस्थापक, माथाडी कामगार कायद्याचे जनक स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून माथाडी कामगारांची एकजूट कायम ठेवणं, माथाडींच्या हक्काची लढाई लढत राहणं, माथाडींना न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या जीवनात सुधारणा घडवणं, हीच स्वर्गीय अण्णासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय अण्णासाहेबांचे स्मरण करुन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

स्वर्गीय अण्णासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अण्णासाहेबांनी या राज्यातल्या शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्कांची लढाई लढली. माथाडींना संघटीत करुन त्यांच्या श्रमाला मोल आणि समाजात सन्मान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. अण्णासाहेबांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनला तसेच माथाडींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांना बळ देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. माथाडी कामगारांच्या घरांचा, आरोग्याचा, मुलांच्या शिक्षणाचा, मुलांच्या नोकरीचा प्रश्न सोडवून माथाडी बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना संकटकाळात सुरक्षित वातावरण निर्माण करुन देण्यात येत आहे. बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे भागभांडवल ४०० कोटीने वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. आवश्यकतेनुसार माथाडी मंडळाला अधिक निधीही उपलब्ध करुन येणार आहे. स्वर्गीय अण्णासाहेबांनी मराठा समाजालाही संघटीत करुन त्यांच्या हक्काचा लढा सुरु केला. आज हा लढा निर्णायक टप्प्यावर आला असताना मराठा बांधवांनी आपली एकजूट कायम ठेवली पाहिजे. स्वर्गीय अण्णासाहेबांचा लढा हा मराठा बांधवांसाठी, कष्टकरी माथाडींसाठी, समस्त कामगार वर्गाच्या हक्कासाठी होता. त्यांचा लढा, त्यांचे विचार, कार्य पुढं घेऊन जाणं, माथाडी बांधवांची चळवळ भक्कम करणं, स्वर्गीय अण्णासाहेबांना अपेक्षित महाराष्ट्र घडवणं हीच अण्णासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area