मानवतेची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


मुंबई दि. ३० : शासकीय रूग्णालयातील डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेटरन), स्वच्छता निरीक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कोरोना महामारीच्या संकट काळात निष्ठेने सेवा करीत आहेत. या सर्व कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

कोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, द कामा ॲण्ड ॲलब्लेस रूग्णालय, गोकुलदास तेजपाल (जीटी) रूग्णालय आणि जे.जे. रूग्णालयातील कोविड वॉरियर्सचा राजभवन येथे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनंदनपर भाषणात राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, माता-पिता-गुरू आणि देव यांचे आयुष्यातील स्थान महत्त्वाचे आहे. यामध्ये आपण देवाला पाहिले नाही परंतु, जेव्हा प्रकृती खराब होते, तेव्हा आपल्याला डॉक्टरच आठवतात आणि हेच आपल्यासाठी देव आहेत. कोरोनाच्या रूग्णांना अतिशय प्रेमाने आणि माणुसकीने शासकीय रुग्णालयात उपचार देण्यात येत आहेत. राजभवन येथील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले होते, मात्र आज सर्व ठणठणीत आहेत. अशाचप्रकारे आर्थिकदृष्ट्या गरीब रूग्णही पूर्णत: स्वस्थ होणे गरजेचे आहे आणि तेच आपले कर्तव्य असून, पुढेही आपल्याकडून असेच कार्य सुरू रहावे. या कालावधीत कार्यरत असणाऱ्या ज्या  वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांना सुदृढ आरोग्य लाभावे, ही भावनाही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेट्रन), स्वच्छता निरीक्षक आदींसोबत वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी उत्तम काम केले आहे. सुरुवातीला कोविड-१९ संदर्भात अधिक माहिती नसल्याने अनेक अडचणींना आणि रूग्णांच्या मृत्युला सामोरे जावे लागत होते. मात्र, या परिस्थितीतही सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी तत्परतेने कार्यरत आहेत. सुरुवातीला तीनच लॅब होत्या मात्र आज १५४ लॅब, १४९० व्हेंटीलेटर, १६५० आयसीयु बेड, तीन लाख सात हजार बेड, १८ मेडिकल कॉलेज उपलब्ध आहेत. सुरुवातीला मृत्युदर ५० टक्के होता. आज २.६ टक्के आहे आणि हाच मृत्युदर शून्य टक्क्यावर नेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाअंतर्गतही काम सुरू असून, शून्य टक्के मृत्युदरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य लवकरच पूर्ण करू, असेही डॉक्टर लहाने यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांनी अनुभव कथन केले. जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वर, राज्याच्या कोवीड लॅबरॉटरीचे नियंत्रक डॉ. सचिन मुलकुटकर आदींसह ३३ कोविड वॉरियर्सना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area