भंडारा येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळेला मंजुरी – आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे

 


भंडारा दि. 25 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भंडारा येथे कोविड-19 स्वॅब तपासणी प्रयोगशाळा (आरटीपीसीआर लॅब) सुरू करण्यास मंजुरी देण्यात येत असून आठ दिवसांच्या आत प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिले. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सपोर्ट बेड या सूविधा अद्ययावत करण्यासोबतच  पॉझिटीव्ह रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व तपासण्या वाढविण्याच्या सुचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. स्वॅब तपासणी प्रयोगशाळा भंडारा येथे होणार असल्यामुळे तपासणी अहवाल तात्काळ उपलब्ध होणार आहे. यामुळे पॉझिटीव्ह रूग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथील सुविधांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री नाना पंचबुधे, धनंजय दलाल व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 कोविड-19 चे लक्षणं असलेल्या संशयीत रूग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर तो तपासण्याची सुविधा भंडारा येथे नव्हती. स्वॅब नागपूर येथे तपासणीसाठी पाठवावे लागत आहेत. अहवाल येण्यास 2 ते 3 दिवस उशीर होत असल्याणे उपचारासाठी वेळ लागत आहे. ही अडचण पाहता भंडारा येथे तातडीने आरटीपीसीआर  तपासणी प्रयोगशाळा मंजूर करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ही प्रयोगशाळा एका आठवडयात कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या साठी लागणारे मनुष्यबळ जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकारात तात्काळ उपलब्ध करून घ्यावे. तसेच प्रशिक्षणासाठी नागपूर येथे पाठविण्यात यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्क वापरण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या. मास्क न वापरणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिस विभागाला दिले.

जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्यमंत्री यांच्या हस्ते ट्रुनॅट प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. सदर मशिनव्दारे दिवसाला 60 टेस्ट होऊ शकतात यामुळे दोन तासामध्ये निश्चित व अचूक निदान करणे शक्य होणार आहे. याव्दारे कोरोना रूग्ण तपासणीस वेग प्राप्त होणार आहे. ट्रुनॅट मशिनव्दारे कोविड-19 चे अचूक निदान होऊन तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.  कोविड-19 उपचारासाठी मणुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी निदर्शनास आणून दिले. कोविड-19 च्या उपचारासाठी लागणारे डॉक्टर, नर्स व वार्डबॉय यांची तात्पूरती भरती करण्याचे सर्व अधिकार आरोग्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे लिक्वीड ऑक्सिजन टँक उभारण्याच्या प्रस्तावास आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत मंजूरी दिली. त्याच प्रमाणे 20 ड्युरा सिलेंडरच्या प्रस्तवासही यावेळी मंजूरी देण्यात आली. उपजिल्हा रूग्णालय तुमसर, साकोली व ग्रामीण रूग्णालय पवनी येथे कोविड रूग्णालय स्थापन करण्याकरीता आवश्यक मणुष्यबळ मंजूर करण्याची विनंती आरोग्य विभागाने या बैठकीत केली. असता त्यांनी सहमती दिली.

रेमडेसिव्हीर औषधाची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली. रेमडेसिव्हीरच्या दराबाबत बोलतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणाऱ्या रूग्णालयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कार्यवाही करावी. गरीब व्यक्तींना रेमडेसिव्हीर शासनातर्फे मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य रूग्णाला त्रास होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घ्यावी असे सांगूण आरोग्यमंत्री म्हणाले की, जिल्हयातील ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन सपोर्ट बेड तयार करण्यात यावेत. कोरोनाच्या उपचारासाठी आयएमएच्या सदस्यांना सहभागी करून घ्यावे. आयएमए सदस्यांना विश्वासात घेवून उपचाराचे नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा असे ते म्हणाले. कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी  “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम अतिशय उपयुक्त असून या मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणात जनजार्गती करावी असे त्यांनी सांगितले.

जिल्हा सामान्य रूग्णालयात डॉ. टोपे यांनी नर्स व डॉक्टरांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या लढाईत आपले योगदान महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी डॉक्टरांचे मनोबल वाढविले. जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. माथूरकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area