शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी – पालकमंत्री संजय राठोड

 


यवतमाळ, दि. २६ : संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले असून सोयाबीनला चांगलाच फटका बसला आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. एवढेच नाही तर अमरावती, वर्धा, बुलढाणा आदी जिल्ह्यात व राज्यात शेतमालाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बुधवारी याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

 

मडकोना येथील दिनेश गोठे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार कुणाल झाल्टे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुरेश नेमाडे, डॉ. प्रमोद मगर आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, याबाबत जिल्ह्यातून आपल्याकडे तसेच प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे. त्यामुळेच प्रशासनाला सोबत घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात नुकसानग्रस्त शेतमालाची पाहणी करीत आहोत. जास्त पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटले असून सर्वत्र हिच परिस्थिती निदर्शनास येते. शेतकऱ्यांच्या मदतीकरिता शासन कटिबध्द असून येत्या बुधवारी मंत्रिमंडळात शेतमालाच्या नुकसानीबाबत चर्चा करू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुरेश नेमाडे यांनी 25 जूनपूर्वी पेरणी केलेल्या सोयाबीनला कोंब फुटल्याचे विविध ठिकाणच्या भेटीस निदर्शनास आले आहे, असे सांगितले. तर ज्या शेतकऱ्यांनी 25 जूननंतर सोयाबीन पेरले, त्यांचे सोयाबीन अजूनही चांगलेच आहे. मात्र आता आणखी पाऊस आला तर नुकसानीची शक्यता जास्त राहील, असे सांगितल्यावर पालकमंत्र्यांनी 25 जूनपूर्वी व नंतर सोयाबीन पेरलेल्या शेतकऱ्यांची माहिती तात्काळ सादर करावी, असे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी नुकसान झालेल्या पिकांचे प्रशासनाने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी यापूर्वीच जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला दिले आहे.

 

दिनेश गोठे यांच्याकडे चार एकर शेती असून त्यांनी तीन एकरवर सोयाबीन पेरले असल्याचे सांगितले. तर संपूर्ण जिल्ह्यात 2 लक्ष 81 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी माहिती दिली. यावेळी कृषी विकास अधिकारी राजेंद्र धोंगडे, राजेंद्र माळोदे, डॉ. आशुतोष लाटकर, उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड, कैलास वानखेडे, कृषी सहाय्यक राजश्री भलावी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area