जिल्ह्यातील कोविडजन्य परिस्थितीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

 


परभणी, दि. 18 :- जिल्ह्यातील कोविडजन्य परिस्थितीसह पिक विमा व इतर विभागाचा राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आढावा घेऊन योग्य त्या सूचना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. मलिक म्हणाले की, लक्षणे दिसून न येणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरातच सुविधा असतील तर घरीच ठेवा, त्यामुळे यंत्रणेवरील ताण कमी होईल आणि लोकांच्या मनातील कोरोनाची  भीती कमी होईल तसेच पॉझिटिव्ह रुग्णांकडे लक्ष देऊन बाधितांचे होणारे मृत्यू कसे थांबवता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगून रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी मोबाईलवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी त्यामुळे लोकांमध्ये कामाबाबत पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना आजार झाला तर खात्रीने बरा होईल याची खात्री नागरिकांना द्यावी तसेच याबाबत लोककलावंतांच्या माध्यमातून जनजागृती करा अशी सूचना करून “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून यशस्वी करावी. असे निर्देश ही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. यावेळी जिल्ह्यातील समाजसेवक सिद्धार्थ हत्तीअंबिरे,  डॉ.निवृत्ती काळे,  सुशील देशमुख यांच्यासह महसूल, पोलीस, आरोग्य, महापालिका, आदी विभागातील व्यक्तींनी कोविडजन्य परिस्थितीत महत्वपूर्ण योगदान दिले असून असे योगदान देणाऱ्या कोरोना यौद्धांना पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मुथा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, , आणि संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area