संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विकासकामांना गती द्यावी – वनमंत्री संजय राठोड

 


कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन

 

मुंबई, दि. ३० :- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे डिसेंबर २०२० अखेर पूर्ण करावी, असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथील विविध विकासकामांचा आढावा श्री. राठोड यांनी मंत्रालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी ‘युनायटेड वेस्टर्न कंपनी’ सोबत मुंबईच्या विक्रोळीमध्ये 10 हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवडीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या लागवडीसाठी 33 लाख रुपये कंपनीकडून आणि 4 लाख रुपये ‘मॅंग्रोव्ह फाऊंडेशन’कडून देण्यात येणार आहेत.

 

यावेळी महाराष्ट्र कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळाचे उदघाटन वनमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र सुरक्षा बलामार्फत कांदळवनाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक घेतले आहेत. त्यापैकी कर्तव्यावर असताना  तुषार आव्हाड या सुरक्षा रक्षकाचा 22 सप्टेंबर 2020 रोजी  कोविड-19 मुळे मृत्यू झाला. या गार्डच्या कुटुंबियांना 2 लाखाची तत्काळ मदत वनमंत्र्यांनी कांदळवन फाऊंडेशनच्या निधीतून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

 

कांदळवन निसर्ग उद्यान, दहिसर येथे नियोजित असून त्याबाबतचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. वडाळा येथील नियोजित कांदळवन कक्ष कार्यालय तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी  विश्राम गृह व समिती कक्ष बाबतही सादरीकरण करण्यात आले.

 

यावेळी प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे, सह सचिव गजेंद्र नरवणे, कांदळवन कक्षा’चे अपर प्रधान मुख्य वनसरक्षक वीरेंद्र तिवारी, उपवनसंरक्षक निनू सोमराज, विभागीय वन अधिकारी डी.आर पाटील यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्याचे वनबल प्रमुख डॉ. एन.रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area