‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत कोकण विभागाचे काम अव्वल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


नवी मुंबई, दि.25 :- कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण असल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी.ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत.

कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि कोकण विभागातील जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. कोकण भवन येथे नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंग, कोकण पोलीस महानिरीक्षक  निकीत कौशिक उपस्थित होते.

राज्यमंत्री,  कु. आदिती तटकरे  म्हणाल्या, बरे झालेले रुग्ण आणि त्यांची  माहिती  प्रसारमाध्यमांद्वारे सर्वत्र प्रसिद्ध करावी. जनजागृती  प्रचार प्रसिद्धीवर अधिक भर द्यावा. सर्वेक्षण सर्वांसाठी आहे. ही भावना सर्वत्र असावी.

कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी 25 टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.  स्थानिक पालिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणी, सर्वेक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे.  यासाठी संपूर्ण राज्यात 55 हजार 268 आरोग्यपथके तैनात करण्यात आली असून, काल अखेर 70.75 लाख कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे.  यात 2.83 कोटी व्यक्तींची तपासणी झाली आहे.  37 हजार 733 संशयितांपैकी 4 हजार 517 कोविड रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली.

कोकण विभागात 1 कोटी 92 लाख 72 हजार 65 लोकसंख्या असून, 48 लाख 66 हजार 372 कुटुंब संख्या आहे. यासाठी  7 हजार 425 पथकांची आवश्यकता आहे.  त्यापैकी 6 हजार 721 पथके नेमण्यात आलेली आहेत.  दररोज 2 लाख 17 हजार 594 कुटुंबांना भेटी दिल्या आहेत. आजअखेर ही संख्या 10 लाख 64 हजार 143 एवढी होते.  भेटीदरम्यान 1 हजार 403 तापाचे रुग्ण आढळले तर 38 हजार 658 कोरोना सदृश  आढळून आले आहेत. कोकण विभागात 6 हजार 780 ऑक्सिमीटर आवश्यक आहे.  त्यापैकी 6 हजार 420 ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत. 6 हजार 666 थर्मल स्कॅनरची आवश्यकता आहे.  त्यापैकी 6 हजार 602 थर्मल स्कॅनर उपलब्ध आहेत.

कोकण विभागात या मोहिमेसाठी स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरु युवा केंद्राचे युवक, स्पर्धापरिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जात आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत फ्लेक्स, बॅनर, वृत्तपत्र प्रसिध्दी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रसिध्दी करण्यात येत आहे. कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी, क्लोज कॉन्टॅक्टचा शोध आणि प्रभावी उपाययोजना यामुळे रुग्ण दुप्पटीचा वेग 55 दिवसांवर आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जाबाबदारी’ मोहिमेअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले गेले आहेत.  त्यात पालघर जिल्हयात वारली पेंटिंग आणि वारली भाषेमध्ये प्रसिध्दी, सिंधुदुर्गमध्ये दशावताराच्या माध्यमातून प्रसिध्दी, रत्नागिरी जिल्हयात गुडी महोत्सव आणि महापालिकेअंतर्गत 40 जाहिरात फलके, 5 कमानी, 100 बसस्टॉप आणि 75 बसेसवर प्रसिध्दी करण्यात आली आहे.   रायगड जिल्ह्यात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदा, कल्याण डोंबिवली महापालिकाअंतर्गत ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

बैठकीसाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, पालक सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरिक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा कोरोना टास्क फोर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area