शिवाजी विद्यापीठ परीक्षा 17 ऑक्टोबरपासून 50 हजार 417 ऑनलाईन तर 23 हजार 594 विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

 


कोल्हापूर, दि. 9 : शिवाजी विद्यापीठाच्या 17 ऑक्टोबरपासून परीक्षा होत असून एकूण 50 हजार 417 विद्यार्थी ऑनलाईन तर 23 हजार 594 विद्यार्थी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
एकूण विद्यार्थ्यांची संख्या 34 हजार 599 तर विद्यार्थींनींची 39 हजार 415 आहे, असे सांगून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, परीक्षार्थींमध्ये 112 दिव्यांग विद्यार्थी आणि 90 दिव्यांग विद्यार्थीनी आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 293 महाविद्यालयांमध्ये या परीक्षा होणार आहेत. सराव प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत. मौखिक चाचणीही होणार आहे. मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेवेळी आलेल्या अडचणी लक्षात घेवून या परीक्षा घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
सीमा भागात महाविद्यालये सुरू करण्याबाबत आढावा घेण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, दोन जागा निश्चित करण्यात आल्या. डॉल्फिन नावाच्या कंपनीची जागा तात्पुरती घेवून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबत सामंजस्य करार करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. आवश्यक असणारी 10 एकर जागाही शोधण्यात आली असून लवकरात-लवकर शासनाकडून ती मिळवली जाईल. सीमा भागात चांगल्या पध्दतीचे कोर्सेस सुरू करण्यात येतील. लवकरच सीमा भागातील समित्यांसोबत चर्चा करणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सीमा भागात सुरू करण्यात येणारे शैक्षणिक संकुल हे भव्यदिव्य असेल. त्यासाठी देणगी स्वरूपात मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. ग्रंथालये सुरू करण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी एसओपी तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. लवकरच ही ग्रंथालये सुरू करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area