आंबेओहोळ, नागनवाडी प्रकल्प पुनर्वसनाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावा -ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ


कोल्हापूर, दि. 16 : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि संबंधित प्रांताधिकारी यांची पंधरा दिवसात बैठक घेवून आंबेओहोळ आणि नागनवाडी प्रकल्प पुनर्वसनाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आंबेओहोळ, नागनवाडी प्रकल्प पुनर्वसन संदर्भात आज ग्रामविकासमंत्र्यांनी बैठक घेतली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, राधानगरीचे प्रांताधिकारी रामहरी भोसले, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, पाटबंधारे विभागाचे अक्षीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, एस.आर. पाटील, पुनर्वसन तहसिलदार वैभव पिलारे उपस्थित होते.
ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणारी कामे मार्गी लावावीत. अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून रेंगाळलेले प्रश्न सोडवावेत.आंबेओहोळ, नागनवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे काम 20 वर्षापासून सुरू आहे. अधिकाऱ्यांनी गांर्भीयाने लक्ष घालून रेंगाळलेली कामे मार्गी लावावीत. पावसाळ्यापूर्वी घळभरणी करावी. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी सूचनाही पाटबंधारे विभागाला त्यांनी दिली.
प्रांतांना अधिकार द्या
आंबेओहोळ आणि नागनवाडीच्या पुनर्वसनाबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि संबंधित प्रांताधिकारी या दोन्ही कार्यालयांमधील कामकाजामुळे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. ते तात्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांनाच अधिकार द्यावेत. त्यासंदर्भात आजच आदेश काढावेत, अशी सूचना ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी श्री. दौलत देसाई यांना बैठकीमधून संपर्क साधत केली.
गलगले वसाहतीबाबत वन विभागाने जमीन देण्याची पूर्तता करावी
चांदोली अभयारण्यासाठी जमिनी दिलेल्या शाहूवाडी तालुक्यातील निवळे येथील ग्रामस्थांना कागल तालुक्यातील गलगलेमध्ये गावठाण वसाहत जमीन देण्यात आली आहे. याबाबत उच्च न्यायालयाने जमीन मूळ मालकाला देण्याचे आदेश दिल्याने या बाधित ग्रामस्थांच्या वसाहतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाची कागलमध्ये असणारी जमीन देण्याचा ठराव कागल नगरपरिषदेने केला आहे. वन विभागाने याबाबत त्यांना निर्वाह भत्ता देणे तसेच जमीन देण्याची पूर्तता करावी. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून पाठपुरावा करावा, अशी सूचनाही ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच या ग्रामस्थांना अन्नधान्याचे वितरण करण्याची सूचनाही तहसिलदारांना दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area