सावली बेघर निवारा केंद्र हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आदर्श – कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम

 


सांगली, दि. 11,  :सांगली शहरातील सावली बेघर निवारा केंद्र हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात एक आदर्श आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बेघरांना आसरा देणे, त्यांना आधार देणे, त्यांच्यात जीवन जगण्याची क्षमता वाढवणे असे आदर्श काम या ठिकाणी होत आहे. यामध्ये सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचेही मोठे योगदान आहे. त्यासाठी त्यांचे मी मनापासून आभार मानतो, अशा शब्दात सहकार, कृषी, सामाजिक न्याय व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सावली बेघर निवारा केंद्राचा गौरव केला.

 

याप्रसंगी जागतिक बेघर दिनानिमित्त दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियांतर्गत सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका व इन्साफ फाऊंडेशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सावली बेघर निवारा केंद्र सांगली येथे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याहस्ते धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी श्री कदम म्हणाले, निवारा केंद्रामधील काही लोकांमध्ये अजूनही काही करण्याची क्षमता आहे. त्यांच्यासाठी सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेने फळे व भाजीपाला विक्रीसाठी हातगाडी उपलब्ध करुन दिली आहे. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असुन त्यामुळे त्या व्यक्तीला कष्टाचे चार पैसे मिळण्याची संधी मिळणार असून त्याला जगण्याची नवी ऊर्जा मिळणार आहे. याप्रसंणी मंत्रीमहोदयांनी सावली निवारा केंद्राची पाहणी करुन ज्येष्ठांची आपुलकीने चौकशी केली.

 

यावेळी सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, जितेश कदम, सावली निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर हे उपस्थिती होते.

00000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area