जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना गती द्यावी – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

 


मुंबई, दि. 9: जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना गती द्यावी, त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

 

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मुंबई येथील मुख्यालयात बोर्डाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी व इतर अधिकारी उपस्थित होते.

 

जेट्टी सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने ह्या प्रकल्पांना वन विभाग, पर्यटन विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्याकडून आवश्यक असलेल्या परवानग्यांबाबत लवकरच संबंधित विभागांसोबत बैठका आयोजित करण्याचे राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी सूचित केले.

 

राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये बंदरांचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता, किनारपट्टीच्या सर्वांगीण विकासासाठी बोर्ड कटिबद्ध असून, त्यासाठी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले व त्याचबरोबर बंदरांशी संबंधित समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाकडून संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

बैठकीमध्ये कोकण किनारपट्टीवर विकसित झालेली बंदरे, जेट्टी, शिपयार्ड प्रकल्प तसेच विविध टप्यांत विकासाधीन असलेले प्रकल्प, बंदरांमध्ये होणारी प्रवासी जलवाहतूक, प्रवासी सुरक्षिततेसाठी उपाययोजना तसेच जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे, प्रस्तावित कामे, मच्छिमार बंदरांची कामे अशा विविध बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area