राधानगरी इको सेन्सेटिव्ह झोन; अधिसूचना प्रसिद्ध

 


मुंबई दि. 23 : राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत विस्तारित क्षेत्र करुन कोल्हापूर जिल्ह्यातील 26 गावांचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 गावांना पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली.

 

राज्य शासनाने 16 सप्टेंबर 1985 रोजी अधिसूचना काढून 351.16 चौ.किलोमीटर क्षेत्रावर राधानगरी वन्यजीव अभयारण्य जाहीर केले. 1986 ला पर्यावरण कायदा झाला. त्यानुसार अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांच्या बाहेरच्या सीमेपासून 10 किलो मीटरपर्यंत संवेदन क्षेत्र राहील अशी तरतूद करण्यात आली. राज्य शासन, केंद्र शासन यांच्यामार्फत वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांच्या आधारे उप वनसंरक्षक कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील 26 गावे 15 हजार 039 हेक्टर क्षेत्र व सिंधुदुर्गमधील 15 गावे 10 हजार 26 हेक्टर क्षेत्र असे एकूण 250.66 चौरस किलोमीटर  क्षेत्रावर इको सेन्सेटिव्ह झोन प्रस्तावित करुन 9 ऑक्टोबर 2019 ला केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता.

 

त्यावर 15 ऑक्टोबर 2020 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत क्षेत्र निश्चित केले.

 

राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतीसह सस्तन प्राण्यांच्या 47 प्रजाती, सरीसुर्पांच्या 59 प्रजाती, उभयचाऱ्यांच्या 20 आणि फुलपाखरांच्या 60 प्रजाती आढळतात. अभयारण्यात बिबट्या, रानमांजर, जंगली कुत्रे, शेकरु, गवा, पटेरी वाघ, हत्ती आदी आढळतात. अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्र विस्ताराचे क्षेत्रफळ 250.66 चौ. कि.मी. आहे. या क्षेत्रामध्ये व्यावसायिक उत्खनन, प्रदूषण उत्पन्न करणारे उद्योग, जल विद्युत प्रकल्प, लाकूड गिरण्या, विटभट्टी, प्लॅस्टिक पिशव्यांचा उपयोग, व्यावसायिक हॉटेल, प्रदूषण निर्माण करणारे लघु उद्योग, वृक्षतोड यावर निर्बंध असणार आहेत. स्थानिक नागरिकांना घरांच्या बांधणी आणि दुरुस्तीसाठी जमीन खोदाईला परवानगी असणार आहे.

 

राधानगरी वन्यजीव अभयारण्याच्या विस्तारीत क्षेत्राच्या देखरेखीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 13 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचा प्रतिनिधी, राज्य शासनाद्वारे नियुक्त वन्यजीव संरक्षक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेचा प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे क्षेत्रीय अधिकारी, वरिष्ठ नगर योजनाकार, महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागाचा प्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचा प्रतिनिधी, लोक निर्माण विभागाचा प्रतिनिधी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक, राज्य सरकार तर्फे नियुक्त पर्यावरण क्षेत्रातील विश्व विद्यालयातील पर्यावरण क्षेत्रातील विशेष तज्ञ, राज्य जैव विविधता बोर्डाचा सदस्य, सावंतवाडी विभागाचे उप वनसंरक्षक हे सदस्य तर कोल्हापूर विभागाचे उप वन संरक्षक हे सदस्य सचिव असणार आहेत अशी माहितीही वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area