महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

 मुंबई, दि.2 : आधुनिक वाल्मिकी, महाकवी अशा अनेक विशेषणांनी ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो ते प्रतिभासंपन्न साहित्यिक स्वर्गीय ग. दि. माडगूळकर ‘अण्णां’ची तथा ‘गदिमां’ची आज जयंती. ‘गदिमां’नी त्यांच्या कथा, पटकथा, संवाद, गीत लेखनानं, सहजसुंदर अभिनयानं महाराष्ट्राचं साहित्य व कला विश्व समृद्ध केलं. साहित्य व कलेच्या सर्वच क्षेत्रात त्यांचा लीलया संचार होता. ‘गीतरामायणा’सारखं अजरामर काव्य लिहिणाऱ्या आधुनिक वाल्मिकींचं ‘गदिमां’चं महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातलं तसंच रसिकांच्या मनातलं स्थान अढळ आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘गदिमां’च्या कार्याचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.

 

‘गदिमां’ना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘गदिमा’ हे प्रतिभावंत साहित्यिक, चतुरस्त्र अभिनेते होते. ते शब्दप्रभू होते. जीवनाचं सार त्यांनी सोप्या भाषेत मांडलं. साहित्य व कलेच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य केलं. माणदेशी जन्मलेल्या या आधुनिक वाल्मिकींनी रचलेल्या ‘गीतरामायणा’ची जादू अनंतकाळापर्यंत रसिकांच्या मनात राहणार आहे. त्यांनी दीडशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठी कथालेखन केलं. त्या कथांवर हिंदीतही चित्रपट तयार झाले. अलीकडेच त्यांची जन्मशताब्दी आपण साजरी केली. इतकी वर्षे होऊनही ‘गदीमां’चं साहित्य प्रत्येक पिढीशी नातं सांगतं तसंच ते स्वत:ला ज्ञानोबा, तुकोबांच्या विचारांशी जोडतात, हाच त्यांचा मोठेपणा आहे. महाराष्ट्राच्या या महान कवीला मी त्रिवार वंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘गदिमां’बद्दलचा आदर, कृतज्ञता व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area