गांधीजींची विचारसरणी जगभर पोहोचवण्याची गरज – क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार

 


वर्धा, दि 9 : महात्मा गांधींचे विचार  21 व्या शतकातही प्रासंगिक आहेत. गांधीजींच्या विचारातील साधेपणा, मानवता आणि अहिंसा संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची  गरज आहे. गांधी हा एक विचार आहे  आणि केवळ गांधीजींच्या विचारांनीच मानवी आयुष्यात आणि समाजात बदल घडवून आणता येऊ शकतो, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याणमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुनील केदार यांनी केले.

 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने महात्मा गांधी यांची 151 व्या जयंती निमित्त वर्धेत 2 ऑक्टोबरपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गालिब सभागृहात ‘विश्व सभ्यतेसाठी  महात्मा गांधी यांची प्रासंगिकता’ या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला.  याप्रसंगी श्री. केदार यांच्या हस्ते ‘एकविसाव्या शतकातील आचार्य विनोबा भावेंची प्रासंगिकता’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा. रजनीशकुमार शुक्ल, जिल्हाधिकारी  विवेक भीमनवार, प्र.कुलगुरू  प्रा.हनुमान प्रसाद शुक्ल, व प्रा. चंद्रकांत रागीट आणि जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  शंकरप्रसाद अग्निहोत्री उपस्थित होते. लंडन, दक्षिण आफ्रिका, उझबेकिस्तान, मॉरिशस, नेपाळ आणि लिथुआनियासारख्या देशांच्या अभ्यासकांनी वेबिनारमध्ये विचार मांडले.

 

पालकमंत्री श्री.केदार म्हणाले, गांधीनी दाखविलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण करून गावांचा विकास करण्यावर भर दिला पाहिजे. गांधीजींच्या अहिंसक तत्वाची शक्ती सर्व जगाने अनुभवली आहे. गांधीजींनी अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे पालकमंत्री श्री.केदार यांनी सांगितले.

 

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी, बीजभाषणात म्हणाले, १५० वर्षांनंतरही संपूर्ण जग गांधींच्या विचारांनी प्रेरित आहे. गांधीजी त्यांचे काम आणि विचारांमुळे अजूनही प्रासंगिक आहेत. गांधी विचारच  सध्याच्या आव्हानांना सकारात्मक आणि समाधानकारक उत्तर असल्याचे मत त्यांनी मांडले.

 

कार्यक्रमात मुख्य वक्ते लंडनचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, गांधीवादी विचारवंत, पद्मभूषण प्रा. भिखू पारेख यांनी जागतिक सभ्यतेसाठी गांधीजींच्या मूल्यांचे अनुसरण करण्याची आजच्या समाजाची गरज असल्याचे सांगितले. गांधी आपल्याला मानवतेचे, नीतिमत्त्वाकडे जाणारे मार्ग दाखवतात आणि त्यांचे विचार ‘वसुधैव कुटुंबकम्’कडे नेतात.

 

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल म्हणाले,  गांधीजींच्या कर्तृत्वाचा वर्धा शहरावर ठसा उमटला. कुटीर उद्योग आणि स्वावलंबनासाठी गांधीजींनी अखिल भारतीयांना दिलेली अनेक उदाहरणे वर्धेत आहेत.  गांधीजींनी मानवी दिव्यतेबाबत दिलेल्या शिकवणीचा  प्रकाश या भूमीवर प्रत्यक्षात पाहायला मिळतो. गांधीजी  सभ्यता, समानता आणि बंधुत्वाची जीवनप्रणाली आहे. संपूर्ण जगासाठी गांधीजी पर्यायी सभ्यता प्रस्तावित करतात. वर्धा येथे गांधीजींच्या 14 वर्षांच्या कार्यकाळावर आधारित भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेच्या सहकार्याने  प्रकल्प सुरू करणार  असल्याची घोषणा त्यांनी केली.

 

कुलगुरू प्रा. शुक्ल यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना विद्यापीठाने प्रकाशित केलेली पुस्तके भेट दिली.

 

गांधी पीस फाउंडेशन, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. पी व्ही. राजगोपाल म्हणाले, तरुणांमध्ये अहिंसेची, गांधींची विचारसरणी रुजविण्याच्या दिशेने कार्य करण्याची गरज आहे. शैक्षणिक संस्थांना गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वांचा उपयोग प्रत्येक कामात कसा करायचा याचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे,असेही ते म्हणाले.

 

नेपाळमधील ‘द पब्लिक’ च्या संपादक श्रीमती वीणा सिन्हा यांनी गांधी आजही  आणि उद्याही जागतिक सभ्यतेशी प्रासंगिक आहेत. महात्मा गांधींच्या कार्यातून प्रेरणा घेत नेपाळमधील तुळशी मेहेर, बी.सी.पी. कोइराला सारख्या बऱ्याच लोकांनी गांधीजींच्या विचारांवर कार्य करून नेपाळमध्ये स्वातंत्र्य लढा उभारला होता.आजही महात्मा गांधीचा नेपाळमधील लोकांवर  प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. बलवंतकुमार ठाकूर यांनी गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतल्या 23 वर्षांच्या वास्तव्यावर प्रकाश टाकला. दिग्दर्शक या नात्याने गांधींच्या विचारांवरील नाटकांचा उपयोग करून त्यांची संस्कृती तरुणांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले.

 

जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका येथे महावाणिज्य दूत म्हणून काम करणाऱ्या डॉ. अंजू रंजन यांनी गांधींचा वारसा जपला गेला पाहिजे आणि त्याला चालना दिली पाहिजे असे सांगून फिनिक्स सेटलमेंट आणि टॉल्स्टॉय फार्मला जागतिक वारसा स्थळ घोषित करण्याची गरज व्यक्त केली.

 

लिथुआनियाच्या कु. तातियाना अकिडो यांनी गांधीजींच्या अहिंसा, साधेपणा, आत्मनिर्भरता आणि सत्याग्रह या विचारांवर कार्य करण्याची गरज व्यक्त केली.  ताश्कंद, उझबेकिस्तानच्या सरकारी ओरिएंटल विद्यापीठाचे डॉ. निलोफर खोझाएवा यांनीही आपले मत व्यक्त केले.

 

वर्धाचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी स्वागतपर भाषणात गांधीजींनी सेवाग्राम येथे वास्तव्य करून  ग्राम विकास, कुटीरउद्योग आणि सामाजिक परिवर्तनासाठी काम केले. स्वातंत्र्यचळवळीच्या काळात अनेक कामांद्वारे गांधीजींनी जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश दिल्याचे सांगितले.

 

या कार्यक्रमाचे संचालन मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातील असोसिएट प्रोफेसर डॉ नमिता निंबाळकर आणि दूरस्थ शिक्षण संचालनालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ शंभू जोशी यांनी केले.  आभार  विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.  चंद्रकांत रागिट यांनी मानले.  कार्यक्रमाचे  सहसंयोजन डायस्पोरा विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ मुन्नालाल गुप्ता व तत्वज्ञान व संस्कृतीचे विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सूर्यप्रकाश पांडे यांनी केले.  कार्यक्रमात देश-विदेशातील विद्वान, शिक्षक आणि संशोधकांनी ऑनलाइन सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area