मृत्युदर एक टक्क्यापेक्षा कमी आणण्याचा प्रयत्‍न – पालकमंत्री राजेश टोपे

 


जालना, दि. 6 :- जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने सहवासितांचा शोध व तपासण्या अधिक प्रमाणात करण्याबरोबरच मृत्युचा दर एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री               श्री. टोपे बोलत होते.

 

यावेळी आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी श्री सानप, शशिकांत हदगल, भाऊसाहेब जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, डॉ. पद्मजा सराफ  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले, कोरोनाबाधितांच्या संपर्कामधील सहवासितांचा अचुकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 10 ते 15 व्यक्तींचा शोध घेण्यात येत असुन ही संख्या वाढवत ती 20 सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्याबरोबरच या व्यक्तींच्या स्वॅबचा नमुना घेऊन तो तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात यावा.   जिल्ह्यामध्ये असलेल्या ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या माध्यमातुन आरटीपीसीआर तपासणीची संख्या दरदिवशी 800 पेक्षा अधिक होईल, याकडे सर्व संबंधितांनी लक्ष देण्याच्या सुचना करत जिल्ह्यातील कोव्हीड बाधितांची माहिती वेबपोर्टलवर नियमितपणे व जलदगतीने अपलोड होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

 

जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या बहुतांश मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांना उपचाराचे दर ठरवुन देण्यात आलेले आहेत.  ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक प्रमाणात दर रुग्णालयांना आकारता येणार नाहीत.  या सर्व खासगी हॉस्पीटलमध्ये देयकांची तपासणी करण्यासाठी लेखा परिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली असुन त्यांच्या माध्यमातुन देयकांची काटेकोरपणे तपासणी करण्यात यावी. तपासणीमध्ये ज्याही रुग्णालयांनी अधिकचे दर आकारल्याचे दिसुन येईल, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना पैसे भरावे लागतात. कोरोना बाधित व्यक्तींना उपचार देण्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या दर्जाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन जिल्ह्यातील सर्व रुग्णांना शासकीय रुग्णालयातुनच अधिकाधिक प्रमाणात उपचार कसे देता येतील, यादृष्टीने अधिक प्रमाणात प्रयत्न करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

 

ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासु नये यासाठी जिल्ह्यात सर्व ठिकाणी डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर उभारणीवर भर देण्यात येत असुन अंबड, राजुर, घनसावंगी, मंठा येथील डेडीकेटेड कोव्हीड सेंटरचे काम येत्या आठ दिवसांच्या आत पुर्ण करुन हे सेंटर त्वरेने कार्यान्वित करण्याच्या सुचना करत जिल्ह्यात रेमेडीसेवीयर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यादृष्टीने जिल्ह्यात पुरवठा करण्यात येणाऱ्या या इंजेक्शनची अद्यावत नोंद ठेवण्यात यावी.  हे इंजेक्शन कुठल्या रुग्णालयाला पुरविण्यात आले, कोणत्या रुग्णाला देण्यात आले याबाबतचीही नोंद ठेवण्याच्या सुचना पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

 

ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 24 तास मुख्यालयी थांबणे गरजेचे असुन हे अधिकारी मुख्यालयी थांबतील याची आरोग्य विभागाने दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेचा सविस्तर आढावाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area