सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर घरीच उपचार करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

 


भंडारा दि.11 : कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण परिसरात वाढत असल्याने ग्रामीण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांच्या मनातील ही दहशत व भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने माणुसकी जपून जबाबदारी पूर्वक उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरोना रोगाला हद्दपार करण्यासाठी शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून प्रामाणिकरित्या प्रत्येक नागरिकाच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यांच्या घरीच होम आयसोलेशन मध्ये उपचार व्यवस्था करण्याची जबाबदारी ही आरोग्य प्रशासनाची असून यात दुर्लक्षित धोरण अवलंबिल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

 

साकोली तालुक्यातील कोवीड 19 संदर्भात तहसील कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  राज्य व केंद्र शासनाच्या सल्लागार समितीच्या सूचनेनुसार कोरोना रोगाच्या संदर्भात असलेल्या नियमांमध्ये शिथिलता करण्यात आलेली असून ग्रामपातळीवर सरपंच व पदाधिकारी तसेच कुटुंब प्रमुख यांच्या समन्वयातून सौम्य व मध्यम स्वरुपाच्या रुग्णांना घरीच उपचार व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे.  या माध्यमातून नागरिकांमध्ये असलेली भीती ही कायमची दूर व्हावी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी याकरिता जनजागृती करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

 

याप्रसंगी तहसीलदार रमेश कुंभरे यांनी तालुक्यातील  अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व अतिवृष्टी मुळे शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केला याप्रसंगी पटोले यांनी पडझड झालेल्या घराबद्दल पुनर सर्वेक्षण  करण्याच्या सूचना दिल्या. तालुका आरोग्य अधिकारी नंदेश्वर यांनी कोवीड 19 संदर्भात तालुक्यात सध्यास्थितीत 523 एकूण  पॉझिटिव्ह रुग्ण असून 187 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर होम आयसोलेशन मध्ये 156 रुग्ण असून 31 रुग्ण  कोविड  केअर सेंटर मध्ये भरती असल्याची माहिती दिली. पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी निलेश वानखडे यांनी ग्रामपंचायत स्तरावर कोवीड  संदर्भात जनजागृती करीत असल्याची माहिती दिली.

 

कोरोना रोगाला हद्दपार करण्यासाठी मास्टर प्लान तयार करून ग्रामीण नागरिकांना सोयीस्कर होईल अश्या आरोग्यसुविधा ग्रामपातळीवर कशा उपलब्ध  करता येतील याकरिता उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदार, खंड विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले. ज्या रुग्णांच्या घरी होम आयसोलेशन ची सोय नसल्यास गावातीलच शाळांमध्ये अथवा पर्यायी व्यवस्थेनुसार त्या रुग्णांची सोय गावातच करण्यात यावी जेणेकरून नागरिकांमध्ये असलेली प्रशासनाविषयी भीती दूर होईल व नागरिक स्वयंस्फूर्तीने प्रशासनाला सहकार्य करतील अशी भूमिका आपण घ्यावी, अशा सूचना पटोले यांनी केल्या.

 

यावेळी साकोली तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत गावठाणा मधील 91 लाभार्थ्यांना अतिक्रमणाचे  पट्टे नाना पटोले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयातून नवीन शिधापत्रिका सुद्धा वाटप करण्यात आल्या.

 

याप्रसंगी साकोली च्या नगराध्यक्ष धनवंता  राऊत, मुख्याधिकारी माधुरी मडावी व तालुका कृषी अधिकारी सर्व नगरसेवक विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area