जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर देणार : पालकमंत्री चंद्रपूर, दि. २९ ऑक्टोबर :  कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध होण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे.  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी खांबाडा आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण प्रसंगी केले.

वरोरा तालुक्यातील आरोग्यवर्धीनी उपकेंद्र खांबाडाचे उद्घाटन व लोकार्पण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतिभा धानोरकर या होत्या. यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश बांगडे, वरोराचे उपविभागीय अधिकारी श्री.शिंदे, तहसीलदार श्री. काळे, गटविकास अधिकारी संजय बोदेले, वरोरा पंचायत समिती सभापती रवींद्र धोपटे, उपसभापती संजीवनी भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.

नागरिकांना अत्यावश्यक प्रसंगी तातडीने दवाखाण्यात पोहचण्यासाठी  जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्राकरिता खनिज निधीतून  सर्व सोयीसुविधायुक्त एकूण 38 ॲम्बुलन्स घेण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य शासनातर्फे देखील अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शासन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतच आहे. मात्र जनतेनेही स्वतःची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी अंगावर दुखणे काढू नये व वेळीच दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन ना. वडेट्टीवार यांनी केले. माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांची काळजी घेणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व त्यांच्या चमूचे अभिनंदन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी सांगितले की गावातील नागरिकांना उपचारासाठी पुर्वी दूरच्या ठीकाणी जावे लागत होते. मात्र आता गावातच आरोग्य उपकेंद्र झाल्याने येथील व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना घराजवळच आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे.आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज व सुविधायुक्त इमारत उभी झाली असून सदर इमारतीमध्ये लसीकरण कक्ष, ओपीडी कक्ष, तपासणी कक्ष, अभ्यागत कक्ष उभारण्यात आले असल्याचे माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.

खांबाडा जि.प. शाळेच्या दोन वर्गखोल्या बांधकामाचे भूमिपूजन:

खांबाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन वर्गखोल्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

वरील कार्यक्रम प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, केंद्रप्रमुख श्री.कुचनकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वसंत पडवे, शाळेतील शिक्षकवृंद, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area