चंद्रपूर व गडचिरोलीतील रस्त्यांच्या कामाबाबत आढावा बैठक

 


मुंबई, दि. ७ : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हायब्रीड अँन्युईटी अंतर्गत सुरु असलेल्या कामासंदर्भातील आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

 

ही कामे जलदगतीने पूर्ण करण्यासंदर्भात श्री. चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. व चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत सुमारे 1600 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. ही कामे संथ गतीने होत असल्याची बाब श्री.वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या निर्दशनास आणून दिली. तसेच या दोन्ही जिल्ह्यातील संबंधित रस्त्यांची कामे दिलेल्या कंत्राटदारांनी स्वनिधीची उभारणी केली नसल्याचेही तसेच हायब्रिड अॅन्युईटीमधील कामे अपूर्ण निकृष्ट होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्य अभियंता श्री. दशपुते, चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता श्री. साखरवडे, गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता श्री. गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

हायब्रीड अॅन्युईटी योजनेनुसार, संबंधित कामासाठी राज्य शासनाकडून 60 टक्के निधी दिला जातो तर कंत्राटदारांनी बँकेमार्फत अथवा वित्तीय संस्थेमार्फत 40% निधी जमा करायचे आहे. मात्र, अनेक कंत्राटदारांनी स्वहिश्शातून कोणताही खर्च केलेला नसून शासनाच्या 60 %  निधीतूनच कामे करत असल्यामुळे ती कामे निकृष्ट दर्जाची होतात. रस्त्यांची कामे दर्जेदार न झाल्यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार व जलदगतीने व्हावीत, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area