माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानात जळगाव जिल्ह्यात आढळून आले १ लाख १० हजार जुन्या आजारांचे रुग्ण

 


जळगाव, दि. 7– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 12 हजार 477 कुटुंबांतील 34 लाख 81 हजार 169 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यामध्ये 1 लाख 9 हजार 519 जुन्या विकारांचे (कोमॉर्बिड) रुग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

 

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान संपूर्ण राज्यात 15 सप्टेंबर 2020 पासून सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जळगाव महापालिका क्षेत्रात महानगरपालिकेचा आरोग्य विभाग तर जिल्ह्यातील 18 नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात स्थानिक आरोग्य विभागामार्फत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका क्षेत्रात आयुक्त सतीश कुलकर्णी तर नगरपालिका क्षेत्रात नगरपालिका प्रशासन अधिकारी जनार्दन पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.

 

माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 2 हजार 533 पथके, नगरपालिका क्षेत्रांमध्ये 280 तर महापालिका क्षेत्रात 134 असे एकूण 2974 पथके जिल्हाभरात कार्यरत आहेत. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना व राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. आरोग्य विभागाची पथके जळगाव जिल्ह्यातील नागरीकांच्या घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करीत आहेत. यात कुटुंबातील सदस्याचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेत असून ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणांची तपासणी करीत आहेत.

 

जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांनी आतापर्यंत 6 लाख 53 हजार 673 कुटुंबांना भेट दिली असून या कुटुंबातील 27 लाख 7 हजार 311 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीत आरोग्य पथकांना 78 हजार 210 जुन्या विकारांचे, सारीचे 555 तर सर्दी, खोकला, ताप (ILI) चे 6 हजार 332 रुग्ण आढळून आले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात येवून 9 हजार 339 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी 887 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.

 

जिल्ह्यातील अठरा नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील 68 हजार 888 कुटुंबातील 4 लाख 68 हजार 36 नागरीकांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 20 हजार 529 जुन्या आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 683 संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले यापैकी 339 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.

 

त्याचप्रमाणे जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 89 हजार 916 कुटुंबातील 3 लाख 5 हजार 822 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 10 हजार 780 जुन्या आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. तर सारीचे 18, सर्दी, खोकला, तापाचे 179 रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 166 व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते तर 86 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहे.

 

नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area