महिला अत्याचार प्रकरणात महिलांना संरक्षण द्यावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेमुंबई, दि. ७ – सांगली येथील महिला अत्याचार प्रकरणात संबंधित महिलेला संरक्षण देण्यासाठी महिला पोलीस उपलब्ध करून द्यावे. संबंधित प्रकरणाबाबत आरोपपत्र दाखल करण्याबाबत, निर्भया पथकाच्या कामगिरीसंदर्भात पाठपुरावा करून पंधरा दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सांगली आणि सोलापूर येथे झालेल्या महिला अत्याचार प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी वेबिनार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सांगलीचे पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सांगली सत्र न्यायालयात संबंधित आरोपीचा अटक पूर्व जामीन रद्द करण्यात आला असला तरीही, कालमर्यादेत आरोपी फरार घोषित करून दोषारोपपत्र सादर करता येते का यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा. फिर्यादी महिलेच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस उपलब्ध करून द्यावी. याचबरोबर सोलापूर येथील महिला अत्याचार प्रकरणी संबंधित महिलेची मानसिक स्थिती, ती शिक्षण घेत आहे का यासंदर्भात माहिती घ्यावी. साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार संबंधित साक्षीदारास संरक्षण मिळत आहे का, सरकारी वकील त्यांचे समुपदेशन करत आहेत का, यासंदर्भात माहिती घेऊन संबंधित अहवाल तातडीने सादर करावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, ठाणे व पुणे येथे गर्दीच्यावेळी अवजड वाहनांच्या बंदीनंतरही वाहने रस्त्यावर येत असल्याने, ठाणे येथील अवजड वाहनांसाठी प्रतिबंधित कालावधीत वाहने येऊ नयेत यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच पुणे महानगरपालिकेतील पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करू, असेही बैठकीदरम्यान उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस ठाण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे, पुण्याचे वाहतूक अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे उपस्थित होते. त्यांनी गर्दीच्या वेळी येणाऱ्या वाहनांवर कारवाई आणि उपाययोजनासंदर्भात माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area