*पालकमंत्री आदिती तटकरेंनी दिले फणसाड अभयारण्याच्या पर्यटनवाढीसाठी प्रयत्नांचे आदेश*अलिबाग, जि.रायगड,दि.13:- जैवविविधतेने नटलेले फणसाड अभयारण्य आपल्या जिल्ह्याचे वैभव आहे. येथे अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना,उपक्रम राबविणे आवश्यक असून वन विभागाने येथील पर्यटनवाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
दि.11 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी फणसाड अभयारण्य येथील पर्यटनवाढ या विषयाबाबत या अभयारण्यास भेट दिली,त्यावेळी त्यांनी हे निर्देश संबंधित उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलिल, सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर, मंत्री महोदयांचे खाजगी सचिव डॉ. जगन्नाथ वीरकर, प्रांताधिकारी शारदा पाेवार,उपवनसंरक्षक ठाणे (वन्यजीव) डॉ.भानुदास पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक नंदकुमार कुप्ते,तहसिलदार गमन गावीत, फणसाड वनक्षेत्रपाल आर.बी. भोसले, सुपेगाव वनपाल यू.डी. पाटील, सुपेगाव वनरक्षक जी.बी. बांगर,वनरक्षक अरुण पाटील,आतिब खातीब, मंगेश दांडेकर, स्थानिक नागरिक आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी उपस्थित अधिकार्यांसह स्थानिक नागरिकांशीही संवाद साधला. या संवादादरम्यान बचतगटांच्या माध्यमातून येथे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न,बचतगटांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारासाठी प्रयत्न, मधुमक्षिकापालनासारखे उपक्रम, स्थानिक तरुणांना गाईडचे प्रशिक्षण, खादी ग्रामाेद्योग विभागाच्या सहकार्याने लघुउद्योग, हस्तव्यवसायांची निर्मिती व त्यातून निर्मिती केलेल्या उत्पादनांची विक्री आदी विषयांवर चर्चा झाली. त्याचबरोबर फणसाड अभयारण्याकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असून वन विभागाकडूनही अलिबाग-मुरुड रोडवरील साळाव पुलाची देखभाल, आकर्षक कमान, माहितीदर्शक फलक, अंतर दर्शक फलक, साळाव मार्गे तळेखार फाटा प्रवेशद्वार, तारा बंदर मार्गे सर्वा उसरोली प्रवेशद्वार, काेलमांडला (ताराबंदर) समुद्रकिनारा, सर्वा पर्यटन संकुल, सुपेगाव पर्यटन संकुल, स्ट्रीट सोलर दिवे, मोबाईल प्रसाधनगृहे, गॅबियन वॉल, स्वागतकक्ष, अभयारण्याच्या सफारीकरिता पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहने, पारकट्टे, पाहणी मनोरे, सनसेट पॉइंटस्, पर्यटकांना राहण्यासाठी अत्याधुनिक तंबूंची व्यवस्था, डॉर्मेटरी, रेस्ट हाऊस, खानावळ, साेवेनिअर शॉप, प्ले गार्डन, निसर्ग निर्वाचन केंद्र आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही कामे देखील टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी महसूल, वन व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area