लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

 


भंडारा दि.09 : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून येणारे काही दिवस जागरुक राहणे आवश्यक आहे. लोकांच्या मनात भीती असून प्रशासनाने ही भीती दूर करण्यासाठी जागृती मोहीम राबवावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. जिल्हा परिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व नाना पंचबुद्धे यावेळी उपस्थित होते.

 

कोविड19 सह विविध विषयाचा आढावा यावेळी घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार पुढील काही दिवस कोरोना रुग्ण दर वाढता असणार आहे.  याबाबत प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना आखाव्या अशा सूचना त्यांनी दिल्या. मृत्यू संख्या कमी करण्यासाठी आराखडा तयार करावा असे ते म्हणाले. कोविड19 व बेड उपलब्धतेची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोरोनाचे युद्ध जिंकण्यासोबतच लोकांचे प्राण वाचविणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

 

खासगी रुग्णालयात अवाजवी देयक आकारल्या जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून नागरिकांची लूट करणाऱ्या रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. देयकाची तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी यांच्या सोबत पोलीस अधिकारी यांची तपासणी टीम तयार करण्यात यावी. अवाजवी देयक आकारणी करणाऱ्या रुग्णालयाकडून अतिरिक्त आकारलेले पैसे रुग्णास परत मिळवून द्यावे असे ते म्हणाले. प्रसंगी रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयाचा परवाना रद्द करावा, असे नाना पटोले यांनी सांगितले.

 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामागे दीड लाख रुपये मिळतात ही अफवा असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर अशा अफवा पासरविणाऱ्या विरुद्ध पोलीस विभागाने कडक कारवाई करावी असे निर्देश नाना पटोले यांनी दिले.

 

नागरिकांनी स्वतः पुढे येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. जास्तीत जास्त तपासण्या करण्यावर भर द्या असे ते म्हणाले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत आपल्याकडे येणाऱ्या टीमला नागरिकांनी सहकार्य करावे असे म्हणाले. कोरोना आजार असून तो बरा होऊ शकतो ही भावना समाजात रुजविणे गरजेचे आहे, असे सांगून डॉ. कदम म्हणाले की, कोरोना रुग्णांला समाजाने सन्मानाची वागणूक द्यावी. हा आजार आहे गुन्हा नाही ही बाब समजून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 

या बैठकीत पूर परिस्थिती, नुकसान वाटप, कृषी, धान खरेदी, मामा तलावातील गाळ काढणे, कृषी जोडण्या आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी कोविड 19, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी कृषी विभागाचे सादरीकरण केले. बैठकीचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area