महाराष्ट्रातील दोन स्टार्टअपला ‘राष्ट्रीय स्टार्टअप’ पुरस्कार

 नवी दिल्ली दि. 7 : महाराष्ट्रातून मुंबई येथील दोन स्टार्टअपनी सर्वोत्तम कामगिरी करत मानाचा ‘राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार’ पटकाविला आहे.

आरोग्य सेवा श्रेणीमध्ये ‘वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमीटेड’ आणि नागरी सेवा श्रेणीमध्ये ‘तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड’ला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या वतीने येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात आज ‘राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार-२०२०’चा निकाल जाहीर झाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि विभागाचे सहसचिव अनिल अग्रवाल यावेळी उपस्थित होते तर केंद्रीय वाणिज्य व उद्योग विभागाचे राज्यमंत्री सोम प्रकाश हे दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.

देशामध्ये रोजगाराला चालना देण्यासाठी व  नवसंकल्पना प्रत्यक्षात उतरवून नाविन्यपूर्ण उत्पादने व पयार्यी सेवा व्यवस्था निर्माण व्हावी या उद्देशाने ‘राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार’ सुरु करण्यात आला आहे. एकूण १२  श्रेणींमध्ये विविध ३५ गटात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील दोन स्टार्टअपचा यात समावेश आहे.

  

‘वेल्दी थेरपेटिक्स’ ला आरोग्य सेवांमधील सर्वोत्तम स्टार्टअपचा पुरस्कार 

       

आरोग्य सेवा श्रेणीमध्ये एकूण चार गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातील २१ राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमधून एकूण २४९ स्टार्टअपमध्ये या पुरस्कारासाठी स्पर्धा होती. यामधून आरोग्य सेवा पुरविण्याच्या गटात मुंबई येथील ‘वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमीटेड’ ला सर्वोत्तम स्टार्टअपचा  पुरस्कार जाहीर झाला आहे. या संस्थेने रूग्णांसाठी ‘मॉनिटरींग डॅश बोर्ड’ तयार केले असून या माध्यमातून रूग्णांना सतर्कता संदेश पुरविण्यात येतात. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली कार्यरत या सुविधेच्या माध्यमातून रूग्णांना  गुणात्मक सेवा उपलब्ध झाली आहे.

‘तरलटेक सोल्युशन्स’ ला नागरी सेवांमधील सर्वोत्तम स्टार्टअपचा मान

नागरी सेवा श्रेणीमध्येही एकूण चार गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातून सहभागी एकूण १३७ स्टार्टअपमध्ये या पुरस्कारासाठी चुरस होती. यामधून ‘जल व जल जाळे निर्माण करण्याच्या’ गटात मुंबई येथील ‘तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड’ ला सर्वोत्तम स्टार्टअपचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अन्य साधनांअभावी हात पंपावर अवलंबून असणा-या लोकांसाठी या संस्थेने हात पंप विकसीत करून स्वच्छ पाणी  पुरवठा करण्यात नाविन्यपूर्ण कार्य केले आहे.

५ लाख रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून विजेत्या स्टार्टअपला आपल्या प्रकल्पाबाबत कामाची मागणी नोंदविण्यासाठी संबंधित सार्वजनिक प्राधिकृत अधिकारी, कॉर्पोरेट संस्थांपूढे कामाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area