जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामांची कालमर्यादा पाळावी – पालकमंत्री सुभाष देसाई

 


औरंगाबाद, दि.29  :- औरंगाबाद- वैजापूर, औरंगाबाद- सिल्लोड-अजिंठा या रस्त्यांसह जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करत कालमर्यादा पाळण्याचे निर्देश उद्योग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग योजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह पैठण-फुलंब्री उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता व्ही. एन. चामले, सिल्लोड उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, औरंगाबाद ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, शहर अभियंता एस. डी. पानझडे, नॅशनल हायवे ॲथॅारीटी ऑफ इंडीयाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी, जिल्ह्यांतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, शहरातील प्रमुख रस्ते यासह समृद्धी महामार्गाच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी सोपवलेली कामे विहीत कालमर्यादा ठरवून पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. रस्ते दुरुस्तीच्या कामांमध्ये दर्जा आणि कालबध्दता पाळण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देशित करुन श्री. देसाई यांनी वैजापूर -औरंगाबाद रस्ते दुरुस्ती ही प्रथम प्राधान्याने तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे ॲथॅारीटी ऑफ इंडीया या यंत्रणांनी तातडीने सर्व तांत्रिक  बाबींची पूर्तता करुन दुरुस्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी.  मोठ्या प्रमाणात नागरीक प्रवासासाठी वैजापूर, सिल्लोड, अजिंठा या रस्त्यांचा वापर करत असतात त्यांची खराब रस्त्यांमूळे होणारी गैरसोय दूर करुन तत्परतेने प्रवाशांना दिलासा देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी रस्ते दुरुस्ती पूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. तसेच रस्ते पूर्ण करण्याच्या कामामध्ये ना हरकत प्रमाणपत्र, निविदा प्रक्रिया व इतर अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्यासाठी तसेच इतर समस्या सोडवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी संबंधितांनाकडून आढावा घेऊन पाठपुरावा करुन ठराविक कालमर्यादेत सर्व रस्त्यांची दुरुस्ती करुन घ्यावी, असे पालकमंत्र्यांनी सूचित केले.

मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रमुख रस्त्यांसह इतर सर्व रस्ते दुरुस्तीची कामांच्या बाबत माहिती देऊन विहीत मुदतीत कामे पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले. जिल्ह्यातून 121 कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यापैकी 37 कि.मी. काम पूर्ण झाली असून करोडी औरंगाबाद आणि करोडी तेलवाडी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच वैजापूर रस्ते दुरुस्ती कामाची प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक श्री. गाडेकर यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री समृद्धी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार.

जिल्ह्यातील नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग-स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन पालकमंत्री श्री. देसाई यांनी समृद्धी महामार्गामूळे कमी वेळात मोठे अंतर गाठणे प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यादृष्टीने या महामार्गाचे काम गुणवत्तापूर्णरित्या विहीत कालमर्यादेत पूर्ण करावे. त्याठिकाणी प्रवाशांसाठी सर्व आवश्यक सुविधा, नागरी सुविधा केंद्र उपलब्ध करुन द्यावे, असे सूचीत केले. या कामाच्या प्रगती आणि गुणवत्तेची पालकमंत्री सुभाष देसाई येत्या डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 112 किलोमिटर असून रुंदी 120 मी. आहे. शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंज टोल प्लाझा असणार आहे. जिथे नागरिकांना या महामार्गावर प्रवेश करता येईल व बाहेर येता येईल. हा महामार्ग सहा लेन मध्ये असून यावर वाहनांना 150 कि.मी. वेग मर्यादा असणार आहे. महामार्गावर 50 कि.मी. च्या अंतरावर नागरी सुविधा केंद्रही असणार आहे. 1 मे 2021 रोजी नागपूर ते नाशिक महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्याचे नियोजित असल्याचे एमएसआरडीसीचे श्री. साळुंखे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांनी, औरंगाबाद शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे घेण्यासाठी निर्देश केल्याप्रमाणे औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामासाठी रक्कम 462.08 कोटी किंमतीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला होता. त्याअनुषंगाने आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांनी प्राधान्याने मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामांमधून एम. आय. डी. सी., एम. एस. आर. डी. सी. आणि औरंगाबाद महानगरपालिका यांनी प्रत्येकी अंदाजित रु. 50 कोटींची कामे करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याअनुषंगाने एम. एस. आर. डी. सी. मार्फत रु. 42.34 कोटीच्या रस्त्यांच्या कामांच्या ई-निविदा मागविण्यात येऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 अंतर्गत ई पैठण-शिरुर-खर्डा रस्त्याचे दुपदरीकरण करणे, या अंतर्गत 5.7 कि.मी. मध्ये पाटेगाव, सायगाव, दादेगाव जहांगीर या तीनही गावांचा डिसेंबर 2020 अखेर पर्यंत निवाडा होणे अपेक्षित असून डिसेंबर 2021 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.  तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 एच अंतर्गत पालफाटा फुलंब्री ते खुलताबाद  या मार्गाचे काम फेब्रुवारी 2021 अखेर पर्यंत तर  शेवूर, वैजापूर ते येवला या मार्गाचे काम मार्च 2021 अखेर पर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ (भाग-1)औरंगाबाद-सिल्लोड चार पदरी सिमेंट रस्ता मार्च 2021  पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून कामाची सध्यस्थिती ही 48.33 कि. मी. पैकी 22.45 कि. मी. इतके पूर्ण झालेले आहे. डिसेंबर 2020 अखेर पर्यंत चार पदरी रस्त्याचे काम व मार्च 2021 अखेर पर्यंत पुलांचे काम पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ (भाग-2) सिल्लोड-अजिंठा-फर्दापुर चार पदरी सिमेंट रस्ते कामाध्ये  32.63 कि. मी. पैकी 18.90 कि.मी. ईतके काम पूर्ण झालेले आहे. तरी उर्वरीत कामे ही प्रगती पथावर सुरु आहेत. अजिंठा घाटाच्या स्वतंत्र अंदाजपत्रक प्रस्तावास मंजूरी प्राप्त झालेली असून तरी या घाटाची लांबी ही वनक्षेत्रातून जात असल्याने सदर कामाची वनविभागाकडून एनओसी मिळण्याकरीता प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. मार्च 2021 अखेर चार पदरी रस्त्याचे काम व ऑक्टोबर 2021 अखेर पुलांचे काम पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता विद्या चामले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area