कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यास मनुष्यबळासह सर्व साधनसामग्री पुरवण्यासाठी प्रयत्नशिल – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर


 सिंधुदुर्गनगरी दि. २ : कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी सांगितले. जिल्हा मुख्यालय येथील शासकीय विश्रामगृह येथे आज श्री. पाटील यांनी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील, कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, संदेश पारकर, संजय पडते आदी मान्यवर उपस्थित होते.

कोविडच्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्या प्रशासन व आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले असल्याचे सांगून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर म्हणाले की, जिल्ह्यातील मृत्यूदर कमी आहे ही एक चांगली बाब आहे. राज्यातील रुग्ण संख्या कमी असणाऱ्या चार – पाच जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गचा समावेश आहे ही समाधानाची बाब आहे. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही लवकरच मार्गी लागेल. जिल्ह्याला लागणारी सर्व साधनसामग्री पुरवण्यात येईल. सध्या जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळाची कमतरता जाणवते आहे. ही कमतरता कमी करण्यासाठी लवकरच जिल्ह्यात डॉक्टर्स सह इतर पदे भरण्यात येतील, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री श्री. पाटील यांनी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम, उपलब्ध असणारे मनुष्यबळ, उपाययोजना, औषधांचा साठा व पुरवठा, याविषयी सविस्तर आढावा घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area