चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे सुयोग्य अधिवासात संवर्धन-स्थानांतरणाबाबत अभ्यासगट – वन मंत्री संजय राठोड

 मुंबई, दि.७ :- चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे सुयोग्य अधिवासात संवर्धन व स्थानांतरणाबाबत विविध पर्याय तपासणे व उपाययोजना सुचवणे यासाठी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती वन मंत्री  संजय राठोड यांनी दिली.

 

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्याने मानव व वाघ यातील संघर्ष यामध्ये वाढ होत असल्याच्या घटना घडत असल्याची बाब समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर दि. 07 ऑगस्ट 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या संवर्धन, स्थानांतरणाबाबतचा विषय चर्चेला आला असता याबाबत सखोल अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगट नेमण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार एन.आर. प्रवीण, मुख्य वन सरंक्षक, चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. हा अभ्यास गट 31 डिसेंबर 2020 पर्यंत आपला अहवाल शासनास सादर करेल.

 

उपवनसंरक्षक, गोंदिया वन विभाग कुलराज सिंग हे या अभ्यास गटाचे सदस्य सचिव असतील तर उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर डॉ. जितेंद्र रामगावकर, भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून येथील शास्त्रज्ञ डॉ. बिलाल हवीब, सेवानिवृत्त उपवनसंरक्षक संजय ठावरे, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी गिरीश वशिष्ठ, वनसंवर्धन अभ्यासक डॉ. विद्या अत्रेय, अभ्यासक आणि वन्यजीव संवर्धन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरिया, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मधील अभ्यासक आणि शिक्षण तज्ञ संजय करकरे, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोत्रे आणि एल्गार प्रतिष्ठानच्या संस्थापक श्रीमती परोमिता गोस्वामी हे या अभ्यास गटाचे सदस्य असतील.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील मानव – व्याघ्र संघर्षाच्या घटना समजून घेणे आणि त्याचे विश्लेषण करणे, मानव – व्याघ्र संघर्षाबाबत स्थानिकांची मते जाणून घेणे, मानव-व्याघ्र संघर्ष कमी करण्यासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या कार्यवाहीचे विश्लेषण करणे, मानव- व्याघ्र संघर्ष कमी होणेसाठी उपाययोजना सुचविणे याबाबत अभ्यासगट काम करणार असून त्या अनुषंगाने 31 डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करेल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area