विक्रमी धान खरेदीसाठी योग्य नियोजन करा – अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

 मुंबई दि. 9 :  सन 2020-21 खरीप व रब्बी हंगामात विक्रमी धान खरेदी अपेक्षित असल्यामुळे धान खरेदी संबंधित अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच मार्केट फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ यांना सर्व बाबींचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

 

मंत्रालयात सन 2020-21 खरीप हंगामातील धान खरेदी बाबतीत आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी मंत्री श्री भुजबळ बोलत होते.

 

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, सन 2020-2021 मध्ये विक्रमी  धान उत्पादन अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी खरेदीचे नियोजन करावे. यावर्षी विक्रमी धान उत्पादन अपेक्षित असल्याने सद्यस्थितीमध्ये कार्यरत धान खरेदी केंद्रावर ताण येणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहेत, अशा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी धान खरेदी केंद्र चालविण्यास परवानगी देण्यात यावी. मार्केट फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केंद्रे  वाढवावीत. धान उत्पादन जास्त होणार असल्याने त्यानुसार बारदाना उपलब्धतेबाबतही नियोजन करावे. तसेच या अनुषंगाने सार्वजनिक वितरण प्राणालीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे, अशा सूचनाही श्री. भुजबळ यांनी दिल्या.

 

यावेळी  खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार  राजू   कारेमोरे, मनोहर चंद्रीकापुरे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाचे सचिव विलास पाटील, मार्केट फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक, दिलीप हळदे, आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री.राठोड आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area