राज्यात ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ‘पक्षी सप्ताह’ – वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

 


मुंबई, दि. २९ : पक्षी हा निसर्गाच्या जैविक साखळी व जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक आहे.  त्या अनुषंगाने पक्षांबाबत जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पक्षी सप्ताह साजरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळांच्या १५ व्या बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने राज्यात यावर्षीपासून ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड  यांनी दिली.

 

राज्यात पक्षी सप्ताह साजरा करावा व पक्षांबाबत जागृती व्हावी यासाठी पक्षीप्रेमी व संघटना प्रयत्नशील होत्या. त्यामुळे हा विषय राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत चर्चेला आला होता. वन्यजीव साहित्य निर्मितीत ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते मारुती चितमपल्ली यांचा ५ नोव्हेंबर हा जन्मदिवस तर पक्षी अभ्यास शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ.सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबरला असते. या दिवसांचे औचित्य साधून हा पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

 

या सप्ताहामध्ये कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या सर्व सुचनांचे अनुपालन करून पक्षांचे महत्त्व, स्थलांतर व अधिवास, संरक्षण, संर्वधन याबाबत जागृती करण्यात येईल. तसेच ऑनलाईन पक्षी छायाचित्र प्रदर्शन, पक्षी छायाचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात येतील. पक्षी निसर्ग माहिती पत्रके, पुस्तके, भित्तीपत्रके आदि साहित्यही उपलब्ध करुन दिले जाईल. वन विभागाच्या समन्वयाने हा सप्ताह साजरा करण्यात येईल, अशी माहिती श्री.राठोड  यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area