‘कर्तुत्वात भारी मुली कोल्हापुरी’ राज्य पातळीवर पोहचेल मुलींच्या जन्मदर वाढीसाठी मानसिकता बदलण्याची गरज - जिल्हाधिकारी दौलत देसाईकोल्हापूर, दि. 12 : मानसिकता बदलून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी समाज पुढे येईल. त्याचवेळी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि बेटी बढाओ’ अभियानाचे सार्थक होईल. मुलीच खरा आधार आहे. खेळ, शिक्षण आणि राजकारण यात जिल्ह्यातील मुली कुठेही मागे नाहीत, हे सिध्द करुन दाखवलय. ‘कर्तुत्वात भारी मुली कोल्हापुरी’ अभियानाची निश्चितपणे राज्यपातळीवर दखल घेतली जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बोलून दाखवला.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने 11 ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी बढाओ अंतर्गत ‘कर्तुत्वात भारी मुली कोल्हापुरी’ हे घोषवाक्य घेवून फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील, समाज कल्याण सभापती स्वाती सासने, महिला व बाल कल्याण समिती सदस्य कल्पना चौगुले, संगीता रेडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त महिला व बाल विकास विभागाने कर्तृत्वात भारी... मुली कोल्हापुरी ही टॅग लाईन घेऊन एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. कोल्हापूरच्या मुलींनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळया क्षेत्रात ठसा निर्माण केला आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी होता मात्र आता यामध्ये सुधारणा होत आहे. मुलगा- मुलगी एकच असून माणसाच्या मनाने हा बदल स्वीकारल्यास मुलींच्या जन्मदरात वाढ होईल. मुलींच्या जन्मदराबाबत शासकीय आकड्यात गुंतून न पडता मानसिकता बदलायची गरज आहे. परदेशात गर्भ निदान झाल्यानंतर तीचं नाव आधी ठरतं, तिच्या भविष्याचा विचार सुरु करतात. गर्भात असतानाच तिच्या स्वागताची तयारी केली जाते. याच पध्दतीने आपल्याकडेही मानसिकता बदलायची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी व्यक्त केली.
आमदार श्री. अबिटकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच नवनवे उपक्रम, कार्यक्रम राबविले आहेत. आंतररराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त महिला व बाल कल्याण विभागाने कर्तृत्वात भारी... मुली कोल्हापुरी हा सुरु केलेला उपक्रम मुलींना प्रेरणा देणारा आहे. हा उपक्रम देशभर स्वीकारला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महिला बाल कल्याण सभापती श्रीमती पाटील यांनी सर्वांचे स्वागत करुन, महिला व बाल कल्याण विभागामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अंगणवाडी प्रवेश, पोषण माह, मुलींचा जन्मदर वाढविणे यामध्ये उल्लेखनीय काम केले असल्याचे सांगितले,
कोल्हापूरच्या मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. या मुलींनी जिल्ह्याचा नावलौकिक सातासमुद्रपार वाढविला आहे. मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशासन नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीर राहील. मुलींनी आता स्वत:मध्ये बदल करायला हवा. स्वसंरक्षणाची क्षमता प्रत्येकी मुलींनी अगवत करुन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पुढे येणे गरजेचे अल्याचे समाजकल्याण सभापती श्रीमती सासने म्हणाल्या.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिन व सप्ताहानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती प्रास्ताविकात दिली.
कार्यक्रमात बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि बेटी बढाओ पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात नेमबाज तेजस्विनी सावंत, अभिज्ञा पाटील, कुस्तीपटू स्वाती शिंदे, नंदिनी साळुंखे, टेबल टेनिस वैष्णवी सुतार आणि पॅरॉ ऑलंपिक मध्ये यश मिळविलेल्या उज्वला चव्हाण या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
पद्मश्री कुंभार यांची सुत्रसंचालन केले तर सुहास बुधवले यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area