माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम केवळ औपचारिकता म्हणून राबवू नका – कृषिमंत्री दादाजी भुसे

 


मालेगावदि. 3 :  मुख्यमंत्री  महोदयांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम तालुक्यासह संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या उच्चाटनासाठी ही मोहीम उपयुक्त असून या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. ही मोहीम केवळ औपचारिक पध्दतीने राबवता कामा नये, असे निर्देश राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला दिले.

 

कृषिमंत्री श्री.भुसे यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सपना ठाकरे, डॉ.शैलेश निकम, प्रमोद शुक्ला आदि उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी व कार्यकर्त्यांनीही यात सहभाग नोंदवावा. मोहीमेच्या जनजागृतीसाठी होर्डींग्ज बॅनर लावून मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी करण्यात यावी. मोहीमेतील पथकांमधील कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून त्यांना या मोहीमेच्या जबाबदारीची जाणीव करून सर्व नागरिकांची निकषाप्रमाणे तपासणी करण्याबाबत सुचित करण्यात यावे अशा सूचनाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या. तर गृहभेटीला आलेल्या पथकांना नागरिकांनी वस्तुनिष्ठ माहिती सर्वेक्षण पथकाला द्यावी, असे आवाहनही मंत्री  श्री.भुसे यांनी यावेळी केले.

 

तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील दाखल कोविड रुग्णांची माहिती जाणून घेतानाच उपलब्ध औषध साठ्याची माहितीदेखील मंत्री श्री.भुसे यांनी जाणून घेतली. तसेच कोरोनासाठी आवश्यक असलेल्या खाजगी मेडीकल  दुकानांबाहेर उपलब्ध औषध साठा व त्यांच्या किमतींचे फलक दर्शनी भागात लावण्याबाबत नियमीत तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होता कामा नये, यासाठी रुग्णालयाची देयके तपासणीकामी लेखापरीक्षकांची नेमणूक करण्यात यावी. रुग्णालयाच्या दर्शनी भागात विविध सेवांचे दर असलेला फलक लावण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area