राज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

 


मुंबई, दि. 8 : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने शिवभोजन योजना सुरु केली. राज्यात 26 जानेवारी ते 8 ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 2 कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

 

राज्यात 26 जानेवारी, 2020 रोजी शिवभोजन या महत्त्वाकांक्षी योजनेचा आरंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ 10 रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतला. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पाच रुपयात शिवभोजन देण्याच्या निर्णयास मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

 

कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी 11  ते 3 या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.  शहरी भागासाठी प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन देणार आहे.

 

शासनाने शिवभोजन योजना सुरु केल्यानंतर जानेवारी महिन्यात 79 हजार 918, फेब्रुवारी महिन्यात 4 लाख 67 हजार 869, मार्च महिन्यात 5 लाख 78 हजार 31 नागरिकांनी आस्वाद घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन मधील एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अनुक्रमे 24 लाख 99 हजार 257, 33 लाख 84 हजार 040, 30 लाख 96 हजार 232 लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.

 

लॉकडाऊननंतरच्या काळात जुलै महिन्यात 30 लाख 3 हजार 474, ऑगस्ट महिन्यात 30 लाख 60 हजार 319, सप्टेंबर महिन्यात 30 लाख 59 हजार 176 आणि दि. 7 ऑक्टोबरपर्यंत 7 लाख 9 हजार 176 अशा एकूण 1 कोटी 99 लाख 37 हजार 492 गरीब आणि गरजू नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असून शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून आजपर्यंत तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area