राज्यपालांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉनच्या दातृत्व पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

 मुंबई, दि. 27 : टाटा मुंबई मॅरेथॉन दातृत्व पुरस्कार विजेत्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जानेवारी २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांसाठी जास्तीत जास्त निधी जमा करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट फंडरेझर आणि वैयक्तिकांना दातृत्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २९५ सामाजिक संस्थांनी ४५.९० कोटींचा निधी या मॅरेथॉनच्या माध्यमातून जमा केला.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, जानेवारी महिन्यात या मॅरेथॉनचा माझ्या हस्ते शुभारंभ झाला होता. ५५ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक विविध भागातून मॅरेथॉनसाठी सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने स्पर्धक असलेली ही मॅरेथॉन खऱ्या अर्थाने राष्ट्रीय मॅरेथॉनच होती.

स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था आणि ज्यांनी वैयक्तिकरित्या मॅरेथॉनमार्फत विविध सामाजिक कामांसाठी सहकार्य केले, ते कोविड-१९ या महामारीसाठीही सहकार्य करतील अशी अपेक्षा राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केली.

 

श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअरसाठी 2004 मध्ये स्थापना झाल्यापासून दिवंगत धवल मेहता यांनी रु. 2.43 कोटी एवढी सर्वाधिक रक्कम जमा केल्याबद्दल त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते श्री.धवल मेहता यांच्या पत्नी श्रीमती अनुजा मेहता यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेडचे ग्रुप सीएफओ व्ही.एस.पार्थसारथी यांनी केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट प्रोजेक्ट ‘नन्ही कली’ करिता 2.25 कोटी रुपये उभारले.  एनआयआयएफ इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव राव यांनी ईशा फाऊंडेशनसाठी निधी गोळा केला. कोटक महिंद्रा बँकेचे संचालक श्री.के व्ही एस मनीयन यांनी कर्करोग रुग्ण एड असोसिएशनसाठी निधी उभारला, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक विले डॉक्टर यांचाही राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

 

सर्वात जास्त म्हणजे ७.५० कोटी निधी जमा करणारी स्वयंसेवी सामाजिक संस्था श्रीमद राजचंद्रा मिशनच्यावतीने बीजल मेहता यांनी पुरस्कार स्वीकारला. समाजात बदल घडवून आणणाऱ्या विविध संस्थांचा आणि व्यक्तींचा राज्यपालांनी प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला.

युनायटेड वे मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयंती शुक्ला यांनी सांगितले की, जानेवारी २०२० मध्ये झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या व्यासपीठाचा वापर करून 295 स्वयंसेवी संस्थांनी 45.90 कोटी रुपये जमा केले.

 

प्रोकॅम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंग, प्रोकॅमचे सहव्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग आणि टाटा समूहाचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट्ट यावेळी उपस्थित होते.

०००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area