पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे डॉक्टरांचा संप मागे

 


यवतमाळ, दि. २ : गत चार दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारामुळे अखेर मागे घेण्यात आला. आझाद मैदान येथे २८ सप्टेंबरपासून वैद्यकीय अधिका-यांनी ‘जिल्हाधिकारी हटाओ’ या मागणीसाठी संप पुकारला होता. मात्र पालकमंत्र्यांनी प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी संघटनेसोबत गत दोन दिवसांपासून सतत चर्चा करून यात ख-या अर्थाने पालकाची भूमिका निभावली. तसेच संघटनेच्या बहुतांश मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्यामुळे डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला.

संपाच्या ठिकाणी डॉक्टरांसमोर बोलतांना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, मुंबईवरून आल्याआल्याच वैद्यकीय अधिका-यांच्या संघटनेसोबत गुरुवारी चर्चेची पहिली फेरी केली. यात डॉक्टरांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले. पुन्हा शुक्रवारी सकारात्मक चर्चा करण्यात आली. शासन – प्रशासन एका कुटुंबासारखे असून कोरोनाच्या संकटासोबत सर्वच यंत्रणा गत सात महिन्यांपासून अहोरात्र झटत आहे. यात डॉक्टरांचे मोठे योगदान आहे, याची मला जाणीव आहे. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने कोरोनविरुध्दची लढाई लढायची आहे. प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस विभाग व संपूर्ण यंत्रणेने जिल्ह्यात अतिशय चांगले काम केले आहे. यात डॉक्टरांवर सर्वात जास्त ताण आहे.

सर्व यंत्रणांवर ताण असल्यामुळे काही समज गैरसमज झाले असतील. याबाबत संबंधितांना सांगण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून यापुढे सर्व जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी घेतो. वैद्यकीय अधिकारी संघटनेने माझ्यावर विश्वास ठेवावा असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले, जिल्ह्यातील डॉक्टर्स हे फ्रंटलाईन वॉरीअर्स आहेत. सर्व यंत्रणेवर तसेच डॉक्टरांवर कामाचा प्रचंड ताण आहे. काही गैरसमज होऊ शकतात मात्र ते सर्व बाजूला ठेवून आपण पुन्हा जिल्ह्यातील नागरिकांसाठी जोमाने काम करू. जिल्ह्यातील नागरिक हे आपले प्रथम प्राधान्य आहे. आतापर्यंत आपण स्वत: किमान पाच वेळा कोव्हीड रुग्णालयात जाऊन रुग्णांसोबत संवाद साधला आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा यवतमाळ जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. जिल्ह्याच्या नागरिकांना डॉक्टरांची गरज आहे, असे मत जिल्हाधिकारी यांनी मांडले.

पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे हा संप मागे घेत असल्याची घोषणा वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय आकोलकर यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, विजय राठोड, माजी आमदार विश्वास नांदेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, यशवंत पवार, वैद्यकीय अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय आकोलकर, सचिव डॉ. संघर्ष जाधव, डॉ. धर्मेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area