माहिती तंत्रज्ञानात नवनवे आविष्कार घडावेत – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


अमरावती, दि. ३ : माहिती तंत्रज्ञानामुळे ज्ञानविज्ञानाच्या अनेक क्षेत्रात क्रांती झाली. यातील संशोधन अधिकाधिक पुढे जावे यासाठी जिल्ह्यातूनही शिवेंदुसारखे अनेक युवक या क्षेत्रात पुढे येताहेत. तरूणाईची ही संशोधनाची आस व ऊर्जा आश्वासक आहे. यापुढेही माहिती तंत्रज्ञानात नवेनवे आविष्कार घडावेत, अशी आशा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केली.

 

नागपूर येथील रिसर्च फॉर रिसर्जन्स फाऊंडेशन व पंजाबमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपर यांच्यातर्फे  मोबाईल बेस्ड व्हिडीओ कॉन्फरन्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यात अमरावतीच्या शिवेंदु देशमुख या सतरावर्षीय युवकाला विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला असून, आरएफआरएफ येथे इंटर्नशिप व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी शिवेंदुच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला व त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की, केवळ संपर्काच्या क्षेत्रातच नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, अभियांत्रिकी, उद्योग अशा कितीतरी क्षेत्रात विविध स्तरांवर माहिती तंत्रज्ञानाने अनेक बदल घडवले आहेत. पुढील काळातही माहिती तंत्रज्ञान सेवेचे क्षेत्र अधिकाधिक विस्तारत जाणार आहे. संशोधनाची आस असलेली तरूणाई हे देशाचे उज्ज्वल भवितव्य आहे. अमरावतीतून शिवेंदूसारख्या अवघ्या सतरा वर्षाच्या युवकाने राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी शिवेंदुला शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन शिवेंदुचा सत्कार झाला. शिवेंदुचे कुटुंबीय व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area