कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहातील माल वाहतूक लिफ्टचे काम त्वरित पूर्ण करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 


पुणे, दि. 29 : नाट्यगृहांच्या दुरुस्ती-देखभालीची कामे त्वरित पूर्ण करणे गरजेचे असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका येथील आचार्य अत्रे नाट्यगृहातील माल वाहतूक लिफ्टचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

नाट्यगृहांच्या दुरुस्ती-देखभालीच्या कामांसंदर्भात उपसभापती डॉ.गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अभिनेते आदेश बांदेकर, सुबोध भावे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, विभागीय आयुक्त श्री. मिसाळ, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

 

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, सर्व नाट्यगृहांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधांची यादी करण्यात आलेली असून ती सांस्कृतिक विभागाने तात्काळ सर्व महानगरपालिकांना पाठवावी. कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहामध्ये लिफ्ट पारदर्शक असावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. नाट्यगृहांमध्ये कार्यरत असणारे महानगरपालिकेचे कर्मचारी यांना आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात यावे. ज्या ठिकाणी यापूर्वीच कलाकारांना राहण्याची सुविधा उपलब्ध आहे तिथे स्वच्छता व आवश्यक सुविधा योग्य प्रकारे असल्याबाबतची खात्री महानगरपालिका आयुक्त यांनी करावी. प्रत्येक महानगरपालिकांमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांची या नाट्यगृहांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधाच्या अनुषंगाने एक व्यवस्थापन समिती स्थापन करावी, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.

 

उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी कल्याण डोंबिवली-महानगरपालिका येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात नाटकाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी लिफ्ट लवकर बसविण्याबाबत सूचना दिली. यावर आयुक्त श्री.सूर्यवंशी यांनी दोन महिन्यात लिफ्टचे काम पूर्ण करू असे सांगितले.

 

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील नाट्यगृहांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने राज्यातील नाट्यगृहांचे प्रश्न सोडविताना प्राधान्यक्रम ठरवून ते प्रश्न मार्गी लावावेत. नियुक्त करण्यात आलेल्या पथकाची माहिती महानगरपालिका आयुक्तांनाही द्यावी. या पथकाने प्रत्येक नाट्यगृहांची पाहणी करुन प्राधान्याने तेथील समस्या सोडविण्यावर भर द्यावा, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.

 

यावेळी अभिनेते सुबोध भावे यांनी डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद असून तेथील सर्व  दुरुस्तीची कामे करून घ्यावी असे सांगितले. अनेक वेळा नाटकाचे प्रयोग संपल्यानंतर किंवा नाटकाच्या तालमी उशिरा संपल्यानंतर कलाकार व सर्व कर्मचारी यांना निवासाची सोय आवश्यक असते ती सोय अनेक ठिकाणी आहे फक्त ती योग्य प्रकारे करावी. त्याचबरोबर व्यवस्थापक यांनीही या सुविधांकडे लक्ष ठेवावे असे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व अभिनेते आदेश बांदेकर यांनी सांगितले.

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, लिफ्टसाठी आवश्यक असणारा खर्च मंजूर करण्यात आलेला असून हे काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल. डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे नुकताच अडीच कोटी रुपये खर्च करून आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तथापि या सुविधांमध्ये आणखी आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी अभिप्रेत असतील तर त्यासाठी कलाकारांबरोबर भेट देऊन त्या सुविधांची पूर्तता करण्यात येईल असेही डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.

 

नगरविकास प्रधान सचिव श्री.महेश पाठक यांनी सर्व नाट्यमंदिरात तपशीलवार सूचना देण्यात येऊन समित्या करण्यासाठी राज्यस्तरीय आढावा घेण्यात येईल असे सांगितले. विभागीय आयुक्त श्री.मिसाळ यांनी कोकणातील नाट्यमंदिरांतील सुविधांचा आढावा घेण्याची ग्वाही दिली.

 

बैठक आयोजित केल्याबद्दल अभिनेते व निर्माता आदेश बांदेकर, सुबोध भावे यांनी  उपसभापती डॉ.गोऱ्हे व शासकीय अधिकारी यांचे नाट्य-कलावंताच्या वतीने आभार मानले.

००००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area