रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा धोका टळलेला नाही; खबरदारी आवश्यक – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 


कोल्हापूर, दि. 9 : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब असली तरी जनतेने पुढील धोका टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. जनतेने मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कोव्हिड उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही  मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा राज्यात ५ व्या क्रमांकवर आहे. या मोहिमेतून लोकांच्या आरोग्य  तपासणीबरोबरच इली, सारी या आजराचेही रुग्ण शोधले जात आहेत.

जागतिक  आरोग्य संघटनेने पुढील काही कालावधीत रुग्ण वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण वाढण्याची सूचना आरोग्य विभागाने  केली आहे. ती लक्षात घेऊन बेडची संख्या, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन पुरवठा, रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्ध करून ठेवण्याबाबत नियोजन करावे. कोरोना रुग्णाबरोबरच पोस्ट कोव्हिड रुग्णाची काळजी घेण्यासाठी व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यासाठी वाढीव निधी आणणार

एसडीआरएफमधून जिल्ह्याला २५ कोटी मिळाले असून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा निधी कमी आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करुन  वाढीव निधीसाठी पाठपुरावा करणार असून लवकरच तो निधी जिल्ह्यासाठी मिळवू, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्र्यांनी यावेळी दिली.

बैठकीनंतर माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेचा लोगो असणाऱ्या  टी शर्ट आणि टोपीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area