बिटको रुग्णालयात सर्वच आजारांवर उपचार तसेच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन करा : पालकमंत्री छगन भुजबळ

 


नाशिक दि. 11 ऑक्टोबर 2020 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संसर्गबाधितांवर वेळेवर उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच आरोग्ययंत्रणा कसोशीने प्रयत्न करत असून त्यामध्ये बिटको रुग्णालयाचे नाव अग्रभागी आहे. भविष्यात सर्वच आजारांवर उपचार करणारे रुग्णालय म्हणजे बिटको रुग्णालय असेल तसेच या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी आज येथे केले आहे.

 

आज नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयाची पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आरोग्य उपसंचालक श्री.मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे,  नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, डॉ. जितेंद्र धनेश्वर आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री  श्री. भुजबळ म्हणाले, मुंबई केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर नाशिक बिटको रुग्णालयामध्ये सर्व आजारांचे निदान होईल अशा सुविधा निर्माण करण्यात येऊन सर्व आजारांवर एकाच छताखाली रुग्णांना उपचार कसे मिळतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. तसेच शहराच्या महत्वाच्या ठिकाणी हे रुग्णालय असल्या कारणाने येथे  वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टिने नियोजन करण्यात यावे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी भविष्यात कोविड व्यतिरिक्त कायमस्वरूपी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध असणारे हे रुग्णालय असेल. यात प्रामुख्याने शस्त्रक्रीया, आधुनिक पद्धतीने विविध वैद्यकीय तपासण्या करण्याची देखील सुविधा उपलब्ध करून कोणीही रुग्ण उपचारांपासुन वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी  यावेळी सांगितले आहे.

 

कोविड काळात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यावस्थित होण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात कोविड तसेच इतर रुग्णांसाठी उपयोगात येण्यासाठी साधारण 19 किलो लिटर ऑक्सिजनसाठा असलेली सर्वात मोठी टाकी बसविण्यात आली आहे. तसेच रेडिओलॉजी, रुग्णांची सेवा करण्यासाठी असलेले सुयोग्य मनुष्यबळ यांचे कौतुक केले. कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स, नर्स यांची भेट घेत त्यांचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी आभार मानले.

 

वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे याची प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर आज आश्वासक वाटते, असे सांगून यावेळी बिटको रुग्णालयातील कोविड केअर सेंटरसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वैद्यकीय सुविधांबाबत पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी समाधन व्यक्त केले. पाहणी दरम्यान बिटको रुग्णालयात 100 ऑक्सिजन बेडस् सुरू असून 50 बेडस् तयार आहेत. तसेच या व्यतिरिक्त देखील नव्याने 200 बेडस् उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री  श्री. भुजबळ यांना हॉस्पिटलच्या वतीने  देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area