अमरावती जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पुनर्मांडणी करणार – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 


मुंबई दि. 9 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या 156 गांवे व 2 शहरे सामुहिक पाणी पुरवठा योजनेची पुनर्मांडणी केल्याने या योजनेचा अमरावती विभागात राहणाऱ्या नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

 

105 गांवे वाढीव प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनांबाबतची आढावा बैठक मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखेडे,  जिल्हा परिषद अध्यक्ष बबलुभाऊ देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, मुख्य अभियंता चंद्रकांत गजभिये यांच्यासह प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले , या योजनेअंतर्गत आवश्यक कामांसाठीची प्रशासकीय मान्यता यापूर्वी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कामे करण्यासाठी येत्या महिन्याभरात या योजनेची पुनर्मांडणी करुन कामांसाठीची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात यावी. याशिवाय 144 गावे व 2 शहरांच्या सामुहिक पाणी पुरवठा योजनेबाबतचा संपूर्ण आढावा घेणे आवश्यक असून जलशुद्धीकरण केंद्र, अस्तित्वातील पाण्याच्या उंच टाक्या बांधणे व दुरूस्तीबाबतची कामेही तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देशही श्री. पाटील यांनी दिले.

 

आज अमरावती विभागात धरणात पाणी असले तरी नळ योजनेअंतर्गत पाणी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच 156 गावे व 2 शहरे सामुहिक पाणी पुरवठा योजनांअतर्गत टाक्या उभारण्याचे काम प्राधान्याने करणे आवश्यक असल्याने याबाबत आवश्यक असणारी कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी यावेळी महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area