महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भर – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

 


मुंबई, दि. 26 : भारतीय सिनेमा आणि कलाकार अफगाणिस्तानमध्ये लोकप्रिय आहे. हीच लोकप्रियता येणाऱ्या काळातही अबाधित ठेवत महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

 

अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूत (कॉन्सुल जनरल) झाकिया वारदाक यांच्यासह शफीऊल्ला इब्राहीमी, रफीऊल्ला केलेवल, आसिफ नवरोझे, अहमाद वारीस या शिष्टमंडळाने सोमवारी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री.देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमध्ये येणाऱ्या काळात वैद्यकीय, सांस्कृतिक देवाण घेवाण वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे काम करण्यात येईल. अफगाणिस्तान हा ऐतिहासिक देश असल्याने तेथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. प्रख्यात बौद्ध बामीयान लेणी, काबूल कंदहार ही शहरे व तेथील अनेक वास्तू त्यांचे म्युझियम, इदगाह मशीद, बाबर गार्डन तसेच अनेक निसर्गरम्य डोंगर, दऱ्या आणि धबधबे हे चित्रीकरणासाठी उत्तम पर्याय आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात येथे चित्रीकरण करण्यासाठी काय करता येईल याबाबत आज सांस्कृतिक कार्यमंत्री आणि अफगाणिस्तानच्या शिष्टमंडळामध्ये प्राथमिक बोलणी झाली.

 

अफगणिस्तानच्या वाणिज्यदूत झाकिया वारदाक यांनी महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमध्ये येणाऱ्या काळात सांस्कृतिक देवाण घेवाण वाढावी, वेगवेगळे सांस्कृतिक महोत्सव/ सेमिनार आयोजित केले जावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

0000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area