सामूहिक योग व कवायतीचा उपक्रम कौतुकास्पद – कृषिमंत्री दादाजी भुसे

 मालेगावदि. 11:  देशातील प्रत्येक नागरिक सुदृढ व निरोगी राहून कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावा, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीबरोबरच देशभक्ती रुजविण्यासाठी माजी सैनिकांमार्फत राबविण्यात येणारा सामूहिक कवायत व योगाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

 

शहरातील म.स.गा.महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सामूहिक कवायतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, माजी महापौर शेख रशिद शेख शफी, बाजार समितीचे  उपसभापती सुनिल देवरे, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, तहसिलदार चंद्रजित राजपूत, बंडू काका बच्छाव, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लोटन शेवाळे, दिलीप हिरे,  प्रशिक्षक अमित भावसार, आकाश शेलार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री.भुसे म्हणाले, सेवानिवृत्तीनंतरही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मालेगावच्या माजी सैनिकांनी तालुक्यासह शहरातील प्रत्येक नागरिक सुदृढ व निरोगी राहण्यासाठी देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत व योगाचा उपक्रम सुरू केला आहे. मागील एक महिन्यापासून त्यांनी या उपक्रमावर मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे. शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये या उपक्रमांचे प्रात्याक्षिक व प्रशिक्षण त्यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचे मनोधैर्य वाढून कोरोनाशी लढण्याची शक्ती मिळणार आहे. देशभक्तीपर गितांवर आधारित या कवायती करताना प्रत्येकाच्या मनात देशभक्ती रुजविण्याचे कामही होणार आहे.

 

शहरातील म.स.गा.महाविद्यालयाच्या प्रागंणात सकाळी 06:30 वाजता देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. शहरातील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. प्रत्येकाने मुखपट्टीचा वापर व सुरक्षित अंतर ठेवून या सामूहिक कवायतीमध्ये सहभाग नोंदविला. कोरोनाशी मुकाबला करतांना मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये नैराश्याची भावना तयार झाली होती. आजच्या या कार्यक्रमामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद व देशभक्तीची भावना झळकतांना दिसून आली. माजी सैनिकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात शहरासह तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.

 

सामूहिक कवायतीमध्ये नगरसेवक सुनिल गायकवाड, राजाराम जाधव, जयप्रकाश बच्छाव, नगरसेविका पुष्पा गंगावणे, राजेश गंगावणे, विनोद वाघ, नितीन पोफळे, छायाताई शेवाळे, उषा देवरे, रंजना थोरात, मनिषा ब्राम्हणकर, सोहम योगा अकादमी, स्मार्ट क्लब, महिला संघटना, सामाजिक संघटना, लहान मुले, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले तर आभार शशी निकम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area