२०८ बारवी प्रकल्पबाधितांना एमआयडीसीकडून सेवेत सामावून घेण्याची नियुक्ती पत्रे प्रदान

 


मुंबई, दि. १६ :- बारवी धरणामुळे बाधित झालेल्या २०८ जणांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आजपासून सुरू केली असून पहिल्या टप्प्यात सहा जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहे.

 

महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री आतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु. अदिती तटकरे, आमदार किसन कथोरे, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

 

बारवी धरणाच्या अतिरिक्त साठा पाणी वापर करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या पाणी वापराप्रमाणे प्रकल्पबाधितांना सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमआयडीसी – ३२९, ठाणे महानगरपालिका – २३९, मिरा-भाईंदर – १७९, कल्याण डोंबिवली महानगरपालिका – १५५, नवी मुंबई महानगरपालिका – ६०, उल्हासनगर पालिका – ११९, अंबरनाथ नगरपरिषद – ७१ व म्हाडा – ५२ असे एकूण १२०४ प्रकल्पबाधितांना सेवेत घेतले जाणार आहे.

महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळाने २४२ पात्र उमेदवारांची यादी तयार केली आहे. त्यापैकी २०८ प्रकल्पबाधितांना नियुक्तीपत्र दिले जात आहेत. सहा जणांना नियुक्त पत्रे देण्यात आली. त्यांची नावे :-

१) ज्योत्सना लक्ष्मण पवार (कनिष्ठ अभियंता, स्थापत्य)

२) दिलीप जयवंत भोईर (तांत्रिक सहाय्यक)

३) शीतल दीपक भोईर (लिपिक टंकलेखक)

४) नरेश तानाजी भोईर (वाहनचालक)

५) रमेश धाको कडाली (मदतनीस)

६) कैलास गोपाळ भवर (शिपाई)

 

एमआयडीसीच्या बारवीधरण प्रकल्प योजनेत पहिल्या व दुसऱ्या टप्प्याअंतर्गत एकूण १२ गावे बाधित झाली आहेत. पहिला टप्पा सन १९७२ व दुसरा टप्पा सन १९८६ मध्ये राबविण्यात आला. तथापि  पाणी साठा वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढविण्यासाठी तिसरा टप्पा हाती घेण्यात आला. या टप्प्यात ६ गावे व ५ संलग्न पाडे विस्थापित झाली आहेत. या विस्थापितांचे पुनर्वसनाचे काम एमआयडीसीमार्फत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area