कोरोना आपत्तीला इष्टापत्ती मानून शासकीय रुग्णालये सशक्त करा – पालकमंत्री छगन भुजबळ

 


नाशिक,दि.25 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारे प्रयत्न होत आहे. या आपत्तीला इष्टापत्ती समजून शासनाकडून मिळत असलेल्या निधीतून कोरोनाचे रुग्ण बरे करण्यासोबतच रुग्णालयाचे सशक्तीकरण करा; सर्व शासकीय रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना आणि विविध विकासकामे यांच्या पार्श्वभूमीवर येवला आणि निफाड तालुक्याची आढावा बैठक लासलगाव येथील शिवकमल मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, आ.किशोर दराडे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, राज्य शासनाने सुरू केलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतून जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत नागरिकांचे सर्वेक्षण करत राहा. त्यातून आढळलेले संशयितांचे तात्काळ विलगीकरण करून त्यावर उपचारपद्धती सुरू करा. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबधितांची वैद्यकीय अधिकारी यांनी नियमित चौकशी करून माहिती घ्यावी. त्यांच्या उपचारपद्धतीमध्ये  त्यांना कोणत्याही टप्प्यावर मदत पाहिजे असल्यास उपलब्ध करून द्यावी. अंतिम टप्प्यात असलेल्या येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा. येत्या आठ दिवसात हे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात येईल यानुसार नियोजन करून युध्दपातळीवर प्रयत्न करा. या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना कक्ष आणि सर्वसाधारण रुग्णांचा कक्ष एकमेकांपासून वेगळा कसा राहील याची दक्षता घेण्याच्या देखील सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी उपस्थित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

येवला व निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनास सादर करण्यात यावा. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहिर केली आहे; ती मदत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळवून द्यावी. पंचनाम्याअभावी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना जर मदत मिळाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी दिला आहे.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील जे रस्ते जास्त खराब झाले त्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून रस्त्यांचे प्रश्न सोडवावे. विद्युत विभागानेदेखील प्राधान्याने शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे. सोळा गाव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्रालयीन स्तरावर झालेल्या बैठकीतील मुद्द्यांची माहिती यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी उपस्थितांना दिली आहे.

यावेळी येवला व निफाड तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेत अधिकाऱ्यांना सर्व प्रश्नाचे निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area