अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनचालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे – परिवहनमंत्री अनिल परब

 


मुंबई, दि.2 : अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांना किमान आठ दिवसांचे प्रशिक्षण दिले पाहिजे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले

 

काल दि.1 ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची दहावी बैठक परिवहन मंत्री श्री.परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

 

वाहन अपघात छोट्या अथवा मोठ्या अपघातामुळे  त्या कुटुंबाचे होणारे सामाजिक, भावनिक व आर्थिक नुकसान त्या कुटुंबाबरोबर समाजाला देखील सोसावे लागते. अपघातामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच पण त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेला सुद्धा अडचणी येतात. अपघातामुळे होणारे नुकसान प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हे राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 3 टक्के असल्यामुळे सदर समस्या गंभीर आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही श्री. परब यांनी सांगितले.

 

अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. तसेच योग्य नियोजन करून  ग्रामीण आणि शहरांमधील अपघातप्रवण क्षेत्रे निवडावेत. व त्यावर दीर्घकाळ व तात्पुरत्या उपाय योजना केल्या जाव्यात. क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणारी वाहने, प्रवासी बसमधून विनापरवाना मालाची वाहतूक करणारी वाहने, विनापरवाना चालणारी बेकायदेशीर वाहतूक, तसेच दुचाकी रोड रेसिंग सारख्या बेकायदेशीर कृतीवर  कारवाई करण्याच्या सूचनाही श्री. परब यांनी केल्या.

 

बैठकीमध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेले निर्देश, तसेच या निर्देशानुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे कामकाज, अशा विविध विषयांच्या कार्यवाहीचा आढावा, अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजना, अनुज्ञप्ती निलंबन, अपघात सांख्यिकी इत्यादी विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

 

या बैठकीस परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता,  पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषण कुमार उपाध्ये, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, सी आय आर टी, परिवहन आयुक्त रस्ता सुरक्षा विभाग,  महामार्ग पोलीस वाहतूक आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते.

0000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area