इचलकरंजी/प्रतिनिधी -
बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी 1 लाख 27 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला. येथील मुक्तसैनिक सोसायटीत ही घटना घडली. या प्रकरणी मीना रविंद्र माने (वय 37) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, येथील मुक्तसैनिक सोसायटीतील आदर्श विद्यामंदिर परिसरात मीना माने या कुटुंबासह राहण्यास आहेत. घराला कुलूप लावून त्या 26 नोव्हेंबर रोजी सासुबाई राहण्यास असलेल्या दुसर्या मजल्यावरील खोलीत झोपण्यास गेल्या होत्या. सकाळी त्या घरी परतल्या असता दरवाज्याचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरात जावू पाहिले असता तिजोरीत ठेवलेल्या डब्यातील दिड तोळ्याचे सोन्याचे गंठण, अर्धा तोळ्याच्या कानातील रिंगा, अर्धा तोळ्याची अंगठी, दोन ग्रँमची नथ आणि चांदीचे 7 तोळ्याचे हातातील कडे, 2 तोळ्याच्या जोडव्या असे सुमारे 1 लाख 27 हजारांचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.