इचलकरंजीत एप्रिल 2021 पासून मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस

 


इचलकरंजी/प्रतिनिधी -

केंद्र सरकारच्या सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन स्कीम अंतर्गत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजी शहरात घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅस योजना मंजूर करून आणली होती. या योजनेतून गॅस जोडणी देण्यास लवकरच सुरुवात होत असून त्याची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ हाळवणकर यांचा फॉर्म भरून केला.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी सन 2018 मध्ये सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन योजनेत इचलकरंजी शहराचा समावेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मार्च 2019 मध्ये या योजनेत शहराचा समावेश होऊन एचपीसीएल आणि ओआयएल इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्यांनी एचपी ओआयएल गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना इचलकरंजी शहर तसेच परिसरामध्ये स्वच्छ आणि हरित पर्यावरण पूरक इंधन वितरण करण्यासाठी करण्यात आली आहे. कंपनीची मुख्य गॅस वाहिनी दाभोळ येथून येत असून दक्षिणेमध्ये जाते. पेठवडगाव येथे वितरण केंद्र असून हातकणंगले मार्गे इचलकरंजी शहरात लवकरच मुख्य वाहिनी टाकली जाणार आहे.
शहरातील प्रशासकीय वॉर्ड क्रमांक 5, 7, 2, 11, 17, 18 आणि 20 मध्ये घरोघरी पहिल्या टप्प्यात गॅस जोडणी देण्यात येणार आहे. सध्या कंपनी 618 रुपये इतके डिपॉझिट भरून घेऊन गॅस जोडणी साठी फॉर्म भरून घेत आहेत. मार्च ते एप्रिल 2021 या कालावधीत गॅस पुरवठ्याला सुरुवात होईल. सध्या वापरला जाणारा घरगुती सिलेंडर 14.2 किलो असतो. त्यापैकी काही गॅस द्रव स्वरुपात असतो. तर बराच गॅस वापरा दरम्यान वाया जातो. त्या तुलनेत पाईप मधून येणारा गॅस बराच परवडतो. एका सिलेंडर इतका गॅस पाईपमधून वापरण्याचा खर्च केवळ 440 रुपये इतका येईल.
कनेक्शन खर्च 618 रूपये असून एकत्रितरीत्या अथवा हप्त्याने शुल्क भरता येते. त्यापैकी नोंदणी खर्च 118 रुपये असून तो विनापरतावा आहे. तर 500 रुपये डिपॉझिट असून एकूण 618 रुपये भरून नोंदणी अर्ज स्वीकारला जातो. नोंदणीनंतर गॅस कनेक्शन जोडणीच्यावेळी बर्नर, नॉब,  मीटर, फिटींग व 10 मीटर जीआय पाईप व 10 मीटर कॉपर पाईप देण्यात येईल. गॅस जोडणी झाल्यानंतर पहिले दोन महिने बिल भरावे लागणार नाही. त्यानंतर एक वर्ष बिलांमध्ये बिल व डिपॉझिटचे 500 रुपये द्यावे लागणार आहेत. त्यानंतर केवळ बिल द्यावे लागेल. सुरुवातीचा जोडणी खर्च चेक द्वारे अथवा गुगल पे वर ऑनलाइन अदा केला जाऊ शकतो.
सिलेंडरच्या तुलनेत पाइपद्वारे गॅस वापरल्यास अनेक फायदे होतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे गॅस सिलेंडरची वाहतूक व श्रम कमी होतात. एलपीजी गॅसच्या तुलनेत पाईप मधून येणारा मिथेन गॅस कमी प्रदूषणकारक असतो. त्यामुळे केंद्र सरकारचा पाईप मधील गॅस वापरण्यास प्राधान्यक्रम आहे. एखाद्या महिन्यात वापर बंद राहणार असेल तर कंपनीला तसे कळवल्यास त्या महिन्याचे कोणतेही बिल येणार नाही, अशी माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष हाळवणकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area